सातासमुद्रापार संगीत नाटकाचा तीन अंकी प्रयोग, रत्नागिरीतील अनुप बापटचा कोलंबसमध्ये अभिनव प्रयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दुर्गेश आखाडे

नाटक ही अशी कला आहे की ही सदैव कलाकारांमध्ये जीवंत राहते आणि ती कला जोपासण्यासाठी सातासमुद्रापार गेल्यानंतरही तो कलाकार प्रयत्न करतो. रत्नागिरीतून नोकरीनिमित्त अमेरिकेतील कोलंबस शहरात गेलेल्या अनुप बापटने त्याचा सहकारी शिबी लिखीते याच्यासोबत कोलंबस शहरामध्ये संगीत ययाति आणि देवयानी या नाटकाचा प्रयोग आयोजित केला आहे. पाश्चात्य संगीतामध्ये मंत्रमुग्ध असणाऱ्या अमेरिकन मंडळींना मराठी नाट्यसंगीत अनुभवता येणार आहे. मातृभाषेपासून दूर गेलेल्या मंडळींनाही पुन्हा एकदा आपल्या मायबोलीच्या प्रेमात पडण्याची संधी मिळणार आहे.

रत्नागिरीतील राधाकृष्ण कलामंचमधून अनुप बापट हा आपली कला सादर करत होता. त्याने संगीत स्वयंवर, संगीत सुवर्णतुला या नाटकांमध्ये भुमिका केल्या आहेत. संगीत राज्य नाट्यस्पर्धेत त्याने रौप्यपदकावर गवसणी घातली होती. 2017 साली पुढील शिक्षणासाठी अनुप बापट अमेरिकेत गेला. त्यामुळे संगीत रंगभूमीपासून तो सातासमुद्रापार गेला 2019 ला तो कोलंबस शहरामध्ये नोकरीला लागला. संगीत नाटकापासून दूर गेलेला असला तरी त्याला नाट्यकला खुणावत होती. पण तिथे परदेशात एकटे आपण काय करणार हा प्रश्न त्याला सतावत होता. दरम्यान त्याला आणि एक नाट्यवेडा भेटला, तो म्हणजे पुण्याचा शिबी लिखीते. दोघांनीही कोलंबसमध्ये संगीत नाटक करण्याचा क्रांतीकारी विचार केला. कारण परदेशात मराठी संगीत नाटक करायचे म्हणजे शिवधनुष्य होते. हे शिवधनुष्य उचलण्याचा त्याने निर्णय घेतला. वि.वा.शिरवाडकर यांचे संगीत ययाति आणि देवयानी हे नाटक त्यांनी निवडले आणि या नाटकासाठी मुहूर्तही त्यांनी मराठी रंगभूमीदिनाचा निवडला आहे. 5 नोव्हेंबरला मराठी रंगभूमीदिन असतो. त्याच पार्श्वभुमीवर 4 नोव्हेंबर 2023 रोजी त्यांनी मॅकॉनेल कलाकेंद्र कोलंबस ओहायो या ठिकाणी या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी अनुप बापटने कोलंबस शहरात संगीत सौभद्रचे काही प्रयोग केले होते. नाट्यसंपदाच्या शिर्षकाखाली काही संगीत नाटकातील प्रवेश त्याने सादर केले होते. मात्र तीन अंकी नाटक करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. आपल्या मातृभाषेपासून अनेक वर्षे दूर आलेल्या मंडळींना पुन्हा एकदा मातृभाषेच्या प्रेमामध्ये पाडण्याचा प्रयत्न ही तरुण मंडळी करत आहेत. कोलंबस शहरात पाश्चात्य संगीतामध्ये धुंद असलेल्या परदेशी मंडळींना मराठमोळ्या संगीताचा आस्वाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेता येणार आहे.

शब्दकोषाचा आधार घ्यावा लागला

मार्च महिन्यामध्ये संगीत ययाति आणि देवयानीचा प्रयोग करण्याचे निश्चित झाले. तेव्हापासून मग नाट्यवाचन सुरु झाले. कलाकार मंडळीही अनेक वर्षे परदेशात राहात असल्यामुळे मूळ भाषेपासून दूर गेली होती. त्यामुळे त्यांना अधिक मेहनत घ्यावी लागली. केवळ पाठांतर न करता प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून अभिनय केला तर ते नाटक जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ज्या शब्दांचे अर्थ लागत नव्हते. त्या शब्दांचे अर्थ शब्दकोषांतून शोधण्यात आले.

तालमीसाठी चक्क विमानाने प्रवास

ऋण काढून सण साजरा केला जातो, तसेच नाटक हे ऋण काढून साजरे करणारी लोकं असतात. खिशाकडे न पाहता नाटक करणारी अनेक मंडळी आपण पाहतो. कोलंबसमध्येही अशीच नाट्यवेडी मंडळी एकत्र आली आहेत. या नाटकात भूमिका करणारी अमृता आपटे ही न्यू जर्सीहून कोलंबसला नाटकाच्या तालमीसाठी विमानाने येते. साधारण तिचा हा साडेआठशे किलोमीटरचा प्रवास आहे. मिशीगनहून साडेतीनशे किलोमीटरचा रस्त्याने प्रवास करत गौरव कुलकर्णी, विक्रांत पटवर्धन, पराग भोसले, गिरी ऐगळीकर, अभिजय काणे तालमीसाठी येत असतात. सायली धर्माधिकारी, प्रणव मोघे, अनुप बापट, शिबी लिखीते, सोहा शेवाळे हे कोलंबसमध्येच राहतात. व्हर्जिनियापासून पाचशे किलोमीटर प्रवास करत पार्थ बापट हा तालमीला पोहोचतो. पार्श्वसंगीताची जबाबदारी अनिकेत घिवलीकर आणि दीपक दसवडकर हे सांभाळत आहेत. अशाप्रकारे शेकडो किलोमीटरचा प्रवास करत ही मंडळी संगीत ययाति आणि देवयानी नाटकाची तयारी करत आहेत. विशेष म्हणजे स्वतःच्या खिशातील पैसे काढून ही मंडळी या नाट्यप्रयोगाचे आयोजन करत आहेत.