
सामना ऑनलाईन । चंदीगढ
धुळीच्या वादळामुळे उत्तरेकडील ४ राज्यांना जबरदस्त तडाखा बसला आहे. या वादळामुळे हवेमध्ये पसरलेल्या धुलिकणांमुळे लोकांना श्वास घ्यायला प्रचंड त्रास होतोय. धुळीमुळे समोरचं दिसेनासं झालं असून याचा फटका विमानसेवेलाही बसला आहे. धुळीच्या वादळामुळे चंडीगढ इतल्या विमानतळावरून आज सकाळपासून दिवस मावळेपर्यंत एकही विमान उडू शकलं नाही. यामुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.
पाकिस्तानातून गरम हवेच्या झोतासोबत धूळ हिंदुस्थानच्या दिशेने उडायला लागल्याने हे वादळ सुरू झालं. पर्यावरणतज्ञांच्या मते मोठ्या प्रमाणावर झाडं कापल्याने या वादळाला रोखता आलं नाही. गेल्या तीन दिवसांपासून या चार राज्यांमध्ये धुळीच्या वादळामुळे नागरिकांना भयंकर त्रास झाला आहे. धुळीमुळे हवेचा स्तर खालावला असून यामुळे लोकांना श्वसनाचे त्रास व्हायला लागले आहेत.
हवेमध्ये आर्द्रता नसल्याने आणि पावसाला बराच वेळ असल्याने ही धूळ सहजपणे वातावरणात मिसळायला लागली. हा त्रास आणखी काही दिवस सहन करावा लागणार आहे. या त्रासापासून ताबडतोब सुटका होणार नसली तरी त्याची तीव्रता कमी करता येू शकते असं हवामानतज्ञांचं म्हणणं आहे. या राज्यातील बांधकामांवर तात्पुरती बंदी घालणे, वाहनांचा कमीत कमी वापर, कचरा किंवा ऊसाची चिपाडं न जाळणे हे त्यातले महत्वाचे उपाय असल्याचं स्कायमेटच्या महेश पालावत यांनी सांगितलं आहे.

























































