भटकेगिरी – तरुण डब्लिन : उन्मत्त ब्रिटिश

924

>> द्वारकानाथ संझगिरी

डब्लिन हे जगातलं एक तरुण शहर आहे आणि शहरात सळसळतं तारुण्य जाणवतं. तुम्ही टेम्पलबार विभागात रात्री गेलात की, तुमच्या रात्रीचा दिवस होऊ शकतो. तुम्ही तरुण होता. ‘नाइट लाइफ’ जगण्यासाठी ब्रिटनमधून तिथे रसिक मंडळी येतात. ‘नाइट लाइफ’ याचा तुमच्या मनात आहे तेवढाच चावट ‘मर्यादित’ अर्थ घेऊ नका. तिथं मद्य वाहतं. विशेषतः आयर्लंडची ती काळपट बिअर आणि हो आयरिश कॉफीसुद्धा. (त्यात व्हिस्की असते. त्यामुळे अपेयपान न करणाऱयांनी त्यापासून दूर राहावं.) जगातल्या वेगवेगळय़ा पद्धतीचं खाणं मिळतं. मग पब्ज, डिस्को वगैरे गोष्टी येतातच. तिथल्या वातावरणात एक प्रकारचं चैतन्य असतं. तुमच्या सभ्यतेला धक्का लागणार नाही, असं चैतन्यही तिथे उपलब्ध आहे.

अर्थात डब्लिनला तेवढय़ासाठी जा, असं मी सांगणार नाही. या शहरामधून एक नदी वाहते. तिचं नाव आहे लिफी नदी. ही नदी दक्षिण-उत्तर अशी शहराला दुभंगते. दक्षिण हा भाग तसा दक्षिण मुंबईसारखा श्रीमंत वगैरे आहे. उत्तरेचा भाग तसा मध्यमवर्गीय, पण मध्यमवर्गीयांची त्यांची व्याख्या आणि आली व्याख्या यात विराह कोहली आणि के. एल. राहुल एवढा फरक आहे. ते मस्त संपन्न शहर वाटतं. नुसत्या ओकॉनेल स्ट्रीटवरून चालणं आणि विंडो शॉपिंग करणं हा वेगळाच आनंद आहे. एकेकाळी तो पिटुकला रस्ता होता,  यावर आता विश्वास बसत नाही. तो तब्बल पन्नास मीटर रुंद आहे. मधून ट्राम जाते. दोन्ही बाजूला दोन-दोन लेनचे रस्ते आणि अतिशय रुंद फूटपाथ. फूटपाथला लागून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, शॉपिंगसाठी दुकानं असं त्याचं आजचं रूप आहे. त्या रस्त्यावर आधी ‘लंडन प्लेन ट्री’ होती. ‘लंडन प्लेन ट्री’ हा एक झाडाचा प्रकार आहे. कदाचित ब्रिटिशांचे राज्य तिथे असताना ती लावली असावीत. ती काढण्यामागे ‘राष्ट्रीय’ भावना नसावी किंवा ‘पर्यावरण गेलं खड्डय़ात’ ही वृत्तीही नव्हती. त्या त्या जागी वेगवेगळय़ा  प्रकारची झाडं लावली, ती वाढवली. त्यामुळे त्या रस्त्याला एक वेगळं सौंदर्य लाभलं. आयर्लंडमध्ये पाऊस वर्षभर पडतो. गेल्या वेळी डब्लिनचा एक टॅक्सी ड्रायव्हर मला जुलैमध्ये सांगत होता, (त्यांच्या उन्हाळय़ात) ‘‘गेल्या वर्षी उन्हाळय़ात मी 88 दिवस सूर्य पाहिली नाही.’’ सांगायचा मुद्दा काय की, तिथे पाऊस खूप पडतो. त्यामुळे झाडं लवकर तरारली. पण त्यामागे प्रयत्न होता. मुंबईतही  पाऊस पडतो. झाडं तुटतात, तोडली जातात, पण झाडांना पोटच्या पोराप्रमाणे वाढवायची वृत्ती नसते. त्यांनी हा ओकॉनेल रस्ता सुंदर करताना, जे नवे दिव्याचे खांब उभारले, त्यामागची सौंदर्य दृष्टी लगेच दिसते. कचरा टाकण्याच्या पेटय़ा इतक्या सुंदर आहेत की, त्यात कचरा टाकताना प्रचंड आनंद होतो. कचऱयालासुद्धा आपण सुस्थळी पडल्याची भावना होत असेल.

या रस्त्यावर पुढे जीपीओची प्रचंड भव्य इमारत आहे. तिथे त्यांनी एक स्क्वेअर तयार केलाय. तिथेच त्यांचे राष्ट्रीय कार्यक्रम होतात. तिथे 2003 साली त्यांनी ‘स्पायर ऑफ डब्लिन प्रोजेक्ट’ हाती घेतला. पूर्वी तिथे ‘नेल्सन पिलर’ होता. हा ‘स्पायर ऑफ डब्लिन’ म्हणजे स्टेनलेस स्टीलचं आकाश भेदणारं शिल्प आहे. शिल्प म्हणजे आईस्क्रीम कोनसारखा 390 फुटांचा एक सुळका डब्लिनच्या मध्यभागातून कुठूनही दिसतो.

या हमरस्त्याच्या सौंदर्याला पुन्हा धक्का लागू नये म्हणून त्यांनी त्या विभागातल्या बांधकामासाठी वेगळे नियम तयार केले. कुठल्याही इमारतीत, दुकानात किंवा इतरत्र किंचितही बदल करायचा असेल तर डब्लिन सिटी कौन्सिलची विशिष्ट परवानगी घ्यावी लागते. तुम्हाला  पुस्तकाच्या दुकानाचं फूड स्टॉल वगैरे करता येत नाही. रस्त्याच्या सौंदर्याचा विचार करून मग परवानगी दिली जाते. टेबलाखालून पैसे घेऊन नसावी. या रस्त्यावर आयर्लंडच्या राष्ट्रपुरुषांचे मोठमोठे पुतळे आहेत. त्या राष्ट्र पुरुषांबद्दल तुम्हाला माहिती असेल तर उत्तमच, पण नसेल तर नुसते पुतळे पाहणे हे सौंदर्यदृष्टी असलेल्या माणसांच्या दृष्टीने ‘मिष्ठान्न’ आहे. डोळे तृप्त होतात.

या शहरात आता भरपूर स्थलांतरित येतात. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आयर्लंडमध्ये उच्च राहणीमान. भरपूर पगार आणि त्यांचं युरोपियन युनियनशी असलेलं कौटुंबिक नातं. आता विश्वास बसत नाही की, पूर्वी इथून माणसं देशाबाहेर पळाली. त्याला यादवी आणि धार्मिक युद्धापासून महाभयंकर अवर्षण किंवा दुष्काळ कारणीभूत होता. आयर्लंडमध्ये बटाटय़ांची पैदास मोठी. 1840 मध्ये बटाटय़ांच्या पिकांना रोगाने ग्रासलं. 1845 साली ती कीड पिकात घुसली. 1846 साली कहर झाला. ही आकडेवारी पाहा. 1841 साली आयर्लंडमध्ये आठ दशलक्ष माणसं होती. 1851 साली साडेसहा दशलक्ष होती. म्हणजे दीड दशलक्ष (लोकसंख्येच्या 20 टक्के) माणसं कमी झाली. त्यातली अर्धी मेली, अर्धी देशाबाहेर पळाली. 1911 मध्ये आयर्लंडमध्ये फक्त 4.4 दशलक्ष माणसं होती. म्हणजे सत्तर वर्षांत लोकसंख्या निम्मी झाली. या अवर्षणाची तुलना फक्त बंगालमधल्या 1943 च्या दुष्काळाशी करता येईल. त्यावेळी सहा कोटी बंगाली जनतेमधील 30 लाख माणसं मेली होती. ती फक्त भुकेने मेली नाहीत. भुकेमुळे निर्माण होणारे आजार, लोकांची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती, त्यातून उद्भवलेले मलेरियासारखे रोग यामुळे मेली. गरीब जनता अशावेळी होरपळली जाते. आयर्लंड काय किंवा बंगाल काय, दोन्ही ठिकाणी तेच झालं आणि गंमत म्हणजे दोन्ही ठिकाणी ब्रिटिश राज्यकर्ते होते. बंगालमध्ये हाहाकार माजला तेव्हा दुसरं महायुद्ध सुरू होतं. त्यावेळी भुकेने मरणाऱया लोकांपेक्षा विन्स्टन चर्चिलला त्याचे सैनिक महत्त्वाचे होते, जे बर्माच्या सीमेवर लढत होते. तांदूळ तिथे गेला आणि बंगालमध्ये गरीब माणसं मरत राहिली. आयर्लंडमध्येही लंडनच्या सरकारने ‘आयर्लंडमधल्या ब्रिटिश सरकारने पाहून घ्यावं’’ असं फर्मान काढलं. म्हणजे देव नको करू दे, पण उद्या महाराष्ट्रात दुष्काळ पडला किंवा अस्मानी संकट आले तर दिल्लीने तिथे पाठ फिरवण्यासारखं होतं. तिथे लंडनने पाठ फिरवली. आधीच आयर्लंडमध्ये ब्रिटिशद्वेष होता. तो वाढला आणि आजही कमी झालेला नाही.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या