कुलदीपक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

द्वारकानाथ संझगिरी

लहानपणी मी जादूचा दिवा, त्यातून बाहेर येणारा राक्षस, कुठलंही कठीण काम लीलया करणारा राक्षस वगैरे अनेक कथा वाचल्या आहेत. अगदी त्या वयातही त्या मला खोटय़ा वाटल्या. पण त्या कथांमध्ये तथ्य असावं असं मला आता वाटतंय. तो दिवा सध्या विराट कोहलीने मिळवलाय. मॅचच्या आधी तो घासतो. त्यातून एक राक्षस मात्र बाहेर येत नाही. कुरळय़ा केसांचा उमदा तरुण बाहेर येतो. तो डावखुरा आहे. तो ‘गोलंदाजी’ टाकतो असं रूढ अर्थाने म्हटलं जातं; पण इंग्लिश फलंदाज त्याला ‘भुलंदाजी’ म्हणतात. तो अशा भुलभुलैयात घेऊन जातो की, फलंदाजाला बाहेर पडण्याचा एकच रस्ता दिसतो, तो पॅव्हेलियनकडे जातो. पॅव्हेलियनमध्ये परतल्यावर इंग्लिश फलंदाजांना भुताटकी झाल्याची भावना होते. या भुताटकीपासून बचाव करण्यासाठी केण्टच्या कॅण्टरबरी चर्चमधून काही क्रॉस आणि मक्केहून दोन ताईत मागवले आहेत असं कळतं. (पान १ वरून) बाय द वे, त्या कुरळय़ा केसाच्या तरुणाचं नाव आहे कुलदीप यादव. श्रीकृष्णानंतर यूपी-बिहारच्या यादवांमधल्या सेलिब्रेटिजबद्दल कौतुकाने लिहावं असा एक यादव सापडला. नावाला साजेसा परफॉर्मन्स तो देतोय.

‘केव्हढा मोठा तो होईल? शेन वॉर्न एव्हढा?’ परवाच मला कुणीतरी विचारलं. याचं उत्तर देवच देऊ शकतो. क्रिकेटमध्ये असं तंतोतंत भविष्य सांगता आलं असतं तर अनेक ‘दुसरे’ ब्रॅडमन आणि ‘दुसरे’ सोबर्स त्या दोघांच्या मांडीला मांडी लावून बसले असते. पण सध्या हा यादव गोकुळात आहे. त्याच्या कृष्णलीला सुरू आहेत. कालिया नागाची नांगी तो ठेचतोय. तो उद्या कुरुक्षेत्र गाजवेल का हा विचार आता कशाला करायचा? एव्हढं जरूर म्हणता येईल, गोलंदाजीच्या बाबतीत तो सद्गुणी आहे. त्याचा चायनामन भोवऱयासारखा फिरतो. (जो रुटच्या परवा रात्रभर स्वप्नात येत होता असं म्हणतात.) गुगली फसवा आहे. तो टप्प्यात बदल करतो. त्याच्या चेंडूला भरकटण्याची सवय नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आजचे गोलंदाज जी गोष्ट फार कमी प्रमाणात करतात ते तो करतो. तो चेंडूला फसवी उंची देतो. फलंदाज फॉरवर्ड बचाव करताना तोल जाऊन पडतायत. फिरकी गोलंदाजी पाहताना यापेक्षा सुंदर दृश्य काय असू शकतं? त्यांना ना टप्पा नीट उमगतो, ना टर्न. मग खेळणार कसं?

अहो, दोनदा या मुलाने इंग्लंडला एकहाती हरवलं. एकदा टी-२०त, परवा वनडेत. रोहित शर्माच्या शतकाचं मोल मी कमी करीत नाही. त्याच्या फलंदाजीला सिल्कचा स्पर्श सापडला की मैदान, तो खेळत असताना बिलियर्डस् टेबलसारखं वाटतं. पण ती मुभा त्याला कुलदीप यादव देतोय. तो अर्जुन होतो, कारण हा यादव त्याचं सारथ्य करतोय. बरं, इंग्लंडची फलंदाजी प्रचंड ताकदवान आहे. फलंदाजीला खोली आहे. नॉटिंगहॅमच्या खेळपट्टीवर त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध (झिंबाब्वेविरुद्ध नाही) चारशे ऐंशी धावा पन्नास षटकांत केल्या होत्या. त्या फलंदाजांना हा कुलदीपक टी-२०, वनडेत बचाव करताना बाद करतोय. या फॉरमॅटमध्ये बचाव हा फलंदाजांसाठी टिकण्यासाठी शेवटचा श्वास असतो. इंग्लंडच्या त्याच्या पहिल्या दौऱयात शेन वॉर्ननेही इंग्लंडला इतकं छळलं नसेल. कुलदीपने हातात चेंडू घेतला की इंग्लिश फलंदाजांच्या श्वासातला प्राणवायू कमी होतो.

इंग्लंडला नामोहरम करणारा हा काही पहिला फिरकी गोलंदाज नाही. १९५० साली विंडीजच्या सॉनी रामाधीनने विंडीजला कसोटी मालिका जिंकून देताना असंच छळलं होतं. आपल्या चंद्रशेखरने टणटणीत खेळपट्टीवर इंग्लंडला हरवलं होतं. या दोघांच्या गोलंदाजीतलं ‘गूढ’ त्या काळी फलंदाजांना उकललं नव्हतं. कुलदीपच्या बाबतीत एक महत्त्वाचं ‘गूढ’ असं आहे की, तो चायनामन गोलंदाज आहे. क्रिकेटमध्ये ही ‘चिनी’ घुसखोरी फार कमी होते. चटकन आठवणारं कोण असं मला विचारलं तर तीन नावं मी घेईन. महाराष्ट्राचा विठ्ठल जोशी, ऑस्ट्रेलियाचा ब्रॅड हॉग आणि क्रिकेटमधला एकमेव देवेंद्र सर गारफिल्ड सोबर्स. पण त्याकाळी फलंदाजांना फिरकी खेळण्याची सवय होती. ते तंत्र होतं. आता आक्रमकता खूप वाढलीय. पण बचावात भगदाडं आहेत. त्यात हातातून सुटलेला चेंडू नेमका कुठला आहे ते फलंदाजांना कळत नसेल तर आंधळी कोशिंबीर खेळावीच लागणार.

आता टी-२०, वन-डेत फलंदाज पुढे सरसावत लांब फेकून देतात. पण त्यात पदलालित्यापेक्षा ठरवून केलेलं साहस असतं. रामाधीनला नेटमध्ये पाहून आपला मुश्ताक अली पुटपुटला, ‘याचा मी टप्पा पडू देणार नाही.’ पन्नास-साठ धावा करताना त्याने नाही दिला टप्पा पडून. सुभाष गुप्तेचं नाव खूप ऐकून आलेला ऑस्ट्रेलियाचा नील हार्वे आपल्या यष्टिरक्षक नरेन ताम्हाणेला म्हणाला, ‘हा माझ्यावर चाल करून येण्याअगोदर मी त्याच्यावर चाल करून जाईन.’ त्याने शतक ठोकलं. सुभाष गुप्ते अक्षरशः हलला. दुर्दैवाने या दोघांचं पदलालित्य मी पाहिलेलं नाही. पण इयान चॅपेल पाहिलाय, किम हय़ूज पाहिलाय, आपला सुनील गावसकर पाहिलाय.

कुलदीपला नामोहरम करायला इंग्लिश फलंदाज जातात, पण त्यात फसतात. रिव्हर्स स्वीप त्यांच्या अंगलट येतोय. कॉम्प्युटरचा अभ्यास करून त्यांनी कुलदीपच्या गोलंदाजीचं विश्लेषण केलं असेल. पण खेळपट्टीवर परीक्षा देताना बाजूला नोटस् ठेवून खेळता येत नाही. उद्या ते कदाचित यशस्वी होतीलही, पण तोपर्यंत सिरीज संपली तर?

आणि असं जर घडलं तर कुलदीपही त्यातून शिकेल. त्याला अजून खूप पुढे जायचंय. कसोटीत सातत्याने विकेटस् घ्यायच्या आहेत. शेन वॉर्न व्हायचा मार्ग खडतर असतो. पण तो सध्या सुखावला असेल. टी-२०, वनडेतही त्याच्या गोलंदाजीला कर्णधार गली, स्लिप, शॉर्ट लेग किंवा फॉरवर्ड शॉर्टलेग लावतो. या फॉरमॅटमध्ये वॉर्नच्या चेंडूलाही मानवंदना क्वचित मिळाली असेल.