
अहिल्यानगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्यात आलेली पूरसदृश परिस्थिती, अवकाळी पाऊस आणि दुबार पेरणी यामुळे खरीप हंगाम 2025च्या ई-पीक पाहणी नोंदणीत अडथळे आले. यामुळे राज्य सरकारच्या महसूल विभागाने शेतकऱ्यांना ई-पाहणीसह पुन्हा मुदतवाढ दिली असून, 30 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता येणार आहे.
महसूल विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले असून, राज्यात खरीप हंगाम 2025 साठी शेतकरी स्तरावरून पीकनोंदणी करण्याची मुदत 30 सप्टेंबर रोजी संपली होती. त्यानंतर 1 ऑक्टोबरपासून सहायक स्तरावरून नोंदणी सुरू करण्यात आली होती. ती मुदत 29 ऑक्टोबर होती. मात्र, नैसर्गिक संकटामुळे मोठय़ा प्रमाणावर पीकनोंदणी होऊ शकली नाही. आकडेवारीनुसार, आतापर्यंत डिजिटल क्रॉप सर्व्हेअंतर्गत राज्यातील एकूण क्षेत्रापैकी केवळ 36.12 टक्के पिकांचीच नोंद पूर्ण झाली आहे.
पीकनोंदणी न झाल्यामुळे शेतकरी नैसर्गिक आपत्ती, पीकविमा आणि पीक कर्ज यांसारख्या महत्त्वाच्या लाभांपासून वंचित राहू नयेत, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हा कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीला मुदतवाढ आलेली असल्याने शेतकऱ्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत खरीप हंगाम 2025 ची ई-पीक पाहणी करून घ्यावी, यासाठी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात अद्याप खरीप हंगामातील पिकांची ई-पीक पाहणी झालेली नाही. पीकविमा योजनेसाठी ई-पीक पाहणी सक्तीची असून, अतिवृष्टीच्या अनुदानाचा लाभासाठी ई-पीक पाहणी फायद्याची असून शेतकऱ्यांना पीक कर्जासाठीदेखील ई-पीक पाहणीचा फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करून घ्यावी, असे आवाहन कृषी व महसूल विभागाने केलेले आहे.

























































