
नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच आज पहाटे साडेचारच्या सुमारास डहाणू व तलासरी तालुका भूकंपाने हादरून गेला. बोर्डी, दापचरी, धुंदलवाडी, चिंचले, हळदपाडा या परिसरात एकामागोमाग एक भूकंपाचे तीन धक्के जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. ऐन थंडीत झालेल्या भूकंपामुळे अनेक जण जीवाच्या आकांताने घराबाहेर पळाले. 3.7 रिश्टर स्केलची नोंद झाली असून या भूकंपाचा केंद्रबिंदू गुजरातच्या वलसाडमध्ये असल्याचे दिसून आले आहे. भूकंपाच्या हादऱ्यांमुळे काही घरांना तडे गेले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पालघर जिल्ह्यात अधूनमधून भूकंपाचे धक्के बसतच आहेत. विशेषतः 2018 पासून डहाणू, तलासरी या भागात मोठ्या प्रमाणावर याआधीही अनेकदा भूकंप झाला. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच भूकंपाचे धक्के जाणवले होते. आज पहाटे पुन्हा झाल्याने परिसरातील नागरिकांची झोपच उडाली आहे. ग्रामस्थ गाढ झोपेत असताना आज पहाटे 4 वाजून 25 मिनिटांनी डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी, वारकस, दापचरी, वरखंडा, चारोटी, कासा, अंबोली, अंबेसरी, सायवन, मोडगाव, नारेसवडी, हळदपाडा येथे भूकंपाचे धक्के बसले.
रात्र जागून काढली
पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, वाडा, मोखाडा या भागात मोठ्या प्रमाणावर थंडी आहे. त्यातच भूकंपाचे धक्के बसू लागल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. पहाटे झालेल्या भूकंपामुळे त्यांची झोप तर उडालीच, पण कोणत्याही क्षणी भूकंप होईल या भीतीने अनेकांनी आजची रात्रदेखील जागून काढली. दरम्यान, डहाणूचे तहसीलदार सुनील कोळी यांनी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
तलासरी तालुक्यातील उघवा, वडोळी, सवणे, सुत्रकर, कवाडा, वरवाडा, सवरोली, कोचा, अनविर, कुर्सी या गावांमध्येही भूकंपाचे धक्के बसल्याने लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक प्रचंड घाबरले.
भीतीने ग्रामस्थ घराबाहेर पळाल्यानंतर 4 वाजून 35 मिनिटांनी पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. त्याची तीव्रता 3.7 रिश्टर स्केल एवढी होती. या दुसऱ्या हादऱ्याचा केंद्रबिंदू जमिनीखाली 15 किलोमीटर खोल नानिवलीजवळ असल्याचे सांगण्यात आले.
या भूकंपाचे धक्के शेजारच्या गुजरातमधील उंबरगा, भिलाड व वापी तसेच दादरा-नगरहवेली, सेलवासा, खानवेळपर्यंत बसला. या भूकंपाचा आढावा घेण्याचे काम शासकीय यंत्रणा करीत आहे



























































