दिंडोरी, कळवण तालुक्यातील 12 गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

79

सामना प्रतिनिधी । नाशिक

दिंडोरी व कळवण तालुक्यातील एकूण 12 गावांमध्ये रविवारी आणि सोमवारी असे सलग दोन दिवस भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. आजच्या भूकंपाची तीव्रता भूकंपमापन यंत्रावर 2.1 रिश्टर स्केल इतकी नोंदविली गेली.

दिंडोरी तालुक्यातील पांडाणे, हस्तेदुमाला, माळेदुमाला आणि कळवण तालुक्यातील जामलेवणी, दळवट, बिलवाडी, देवळीवणी, बोरदैवत, देवळीकराड या गावांमध्ये रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास 2 रिश्टर स्केलचे, तर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास 3.1 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. याच गावांमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजून 5 मिनिटांनी 2.1 रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले. याची नोंद नाशिक शहरातील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेतील भूकंपमापन यंत्रावर झाली आहे, अशी माहिती दिंडोरीचे तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांनी दिली.

भूगर्भीय हालचालींमुळे हे सौम्य धक्के बसतात. मात्र, काल आणि आजचे धक्के अगदीच सौम्य असल्याने ग्रामस्थांना कुठलाही आवाज, कंप जाणवलेला नाही. दिंडोरीचे तहसीलदार बाबासाहेब गाढवे, कळवणचे तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या भूकंपमापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी या गावांना भेट देवून पाहणी केली. ग्रामस्थांना सुरक्षेबाबत जागरूक केले.

आपली प्रतिक्रिया द्या