
सुकामेव्यातील विविध पदार्थांपैकी बदामाला खूप महत्त्व आहे. बदाम खाल्ल्याने मेंदूला चालना मिळते. बौद्धिक क्षमता वाढते. यामध्ये शरीर निरोगी ठेवणारी अनेक पोषक तत्त्वे असतात. बदाम भिजवून खाल्ल्यास शरीराला जास्त फायदा होतो, असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे जेवणापूर्वी दररोज 20 ग्रॅम बदाम खाल्ल्यास मधुमेहाचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे जास्त वजन आणि प्रीडायबेटिस असलेल्या लठ्ठ लोकांमध्ये रक्तातील साखरेचे नियंत्रण सुधारते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
जेवणापूर्वी बदामाचे सेवन हे ‘प्रीलोडिंग’चे काम करेल, ज्यामुळे जेवणानंतर ग्लुकोज आणि इन्सुलिनमधील चढउतार कमी करेल आणि नियंत्रण आहाराच्या तुलनेत एकूण हायपरग्लाइसेमियाचे प्रमाणही कमी करेल.
यावेळी अभ्यासाचे असे परिणाम दिसून आले की, आहारातील एक भाग म्हणून रक्तातील ग्लुकोजच्या पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. यामुळे प्रत्येक जेवणापूर्वी बदाम खाल्ल्यास मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
संशोधनात दिसून आले की, बदामामध्ये फायबर, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, झिंक आणि मॅग्नेशियम हे पौष्टिक घटक असतात. त्यामुळे भूकेवर नियंत्रण राहाते. बदामामुळे पोट भरलेले राहते. यामुळे भूक कमी लागते. त्यामुळे वाढत्या वजनावरही नियंत्रण राहते. यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तिंनी रक्तातील साखरेवर नियंत्रण राहावे याकरिता बदामाचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे.



























































