तपास यंत्रणांवर भाजपचा कब्जा; राजकीय विरोधकांविरुद्ध ED-CBI चा हत्यारांसारखा वापर, बर्लिनमधून राहुल गांधी यांचा हल्लाबोल

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपने तपास यंत्रणांवर कब्जा केला असून संविधान संपवण्याचा कट रचला आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) सारख्या संस्थांचा वापर राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी केला जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी जर्मनीतील बर्लिन शहरामधील एका कार्यक्रमात बोलताना केला.

राहुल गांधी तीन दिवसांच्या जर्मनी दौऱ्यावर होते. त्यांनी 18 डिसेंबर रोजी बर्लिन शहरातील हर्टी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित केले. याचा व्हिडीओ काँग्रेसने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात राहुल गांधी यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित करत सरकारवर ताशेरे ओढले.

ईडी आणि सीबीआय सारख्या संस्थांचा वापर भाजप आपल्या राजकीय विरोधकांना दाबण्यासाठी करत आहे. तपास यंत्रणांवर भाजपचा कब्जा आहे. भाजपशी संबंधित लोकांवर या यंत्रणांनी एकही खटला दाखल केलेला नाही. बहुतेक सर्वच खटले राजकीय विरोधकांविरुद्ध आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच ईडी-सीबीआयचा हत्यारांसारखा वापर होत असून या यंत्रणा आता स्वायत्त राहिलेल्या नाहीत, असेही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, आम्ही फक्त भाजपशी लढत नसून त्यांच्या संस्थात्मक ढाच्यावर व तपास यंत्रणांवर केलेल्या कब्जाविरुद्धही लढत आहोत. जर एखाद्या उद्योगपतीने काँग्रेसने पाठिंबा दिला, तर त्यांना धमकावले जाते. तपास यंत्रणा आता स्वायत्त राहिल्या नसून त्या त्यांच्या मूळ उद्दिष्टानुसार काम करत नाही, तर सरकारच्या सांगण्यानुसार काम करतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

काँग्रेसने या संस्था उभारण्यास मदत केली आणि आम्ही कधीही या तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला नाही. आम्ही तपास यंत्रणांना आमच्या मालकीच्या नाही, तर देशाच्या मालकीच्या आहेत असेच मानले. पण भाजप या संस्थांकडे स्वत:ची मालमत्ता म्हणून पाहत असून राजकीय सत्ता मिळवण्यासाठी त्यांचा वापर करत आहे, असे राहुल गांधी म्हणाले. सध्या देशात लोकशाही धोक्यात असून तिला वाचवणे काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले.