कुणी कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय ईडी घेते! शरद पवार यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुणी कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय राजकीय नेते घेत नाहीत तर ‘ईडी’ घेते, असा जबरदस्त हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी यांनी ‘मी परत येईन’, असे जाहीरच केले. कदाचित देवेंद्र फडणवीसांकडून त्यांनी मार्गदर्शन घेतले असावे. पण, ‘मी परत येईन’ म्हणणारे फडणवीस दुय्यम पदावर आले, मोदी कोणत्या पदावर येणार हे मला माहिती नाही, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवसांच्या मराठवाडा दौर्‍यावर आले आहेत. आज त्यांनी दिवंगत निसर्गकवी ना.धों. महानोर यांच्या कुटुंबीयांची पळसखेडा येथे जाऊन भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर दुपारी छत्रपती संभाजीनगर येथे शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्रातील मोदी सरकार देशात दुहीचे विष पेरत असल्याचा आरोप करून भाजपच्या हुकूमशाही वृत्तीला ‘इंडिया’ आघाडी लोकशाही मार्गाने उत्तर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 31 ऑगस्टला मुंबईत आमच्या आघाडीची बैठक होणार आहे. त्यात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करणाऱ्यांना आपण आपला फोटो लावण्यास मनाई केली आहे. परंतु, अजूनही बंडखोरांच्या फलकांवर आपला फोटो दिसतो, असे विचारले असता शरद पवार यांनी यासंदर्भात आम्ही न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.

फाळणीचे प्रदर्शन भरविण्याचे फर्मान
केंद्रातील मोदी सरकार समाजात विष कालवत असून फाळणीच्या वेळी झालेल्या जातीय हिंसाचाराचे प्रदर्शन भरविण्याचे फर्मान काढल्यावरून शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. देशाच्या ऐक्याला बाधा आणण्याचे हे मोठे षड्यंत्र असून जनताच त्याला चोख प्रत्युत्तर देईल, अशी आशा पवार यांनी व्यक्त केली.

लोकशाही मार्गाने आलेली सरकारे पाडण्याचा भाजपला छंद
देशात लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे पाडण्याचा छंदच भाजपला जडला आहे. गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्रात काय झाले हे सगळ्यांनी पाहिले आहे. दुसर्‍यांचे पक्ष फोडून स्वत:चा पक्ष कसा वाढेल? असाच प्रयत्न त्यांचा असतो, असा टोलाही शरद पवार यांनी भाजपला लगावला.

मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक
आम्ही मणिपूरबद्दल बोललो. आम्ही तिथे गेलोही होतो. तेथील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. उत्तर पूर्वेकडील राज्यांची परिस्थिती भयानक आहे. दोन समाज एकमेकांचे वैरी झालेत. याच भागाला लागून चीनची सीमा आहे. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज असताना मोदींना मात्र स्वत:च्या खुर्च्यांची काळजी लागून राहिलीय, अशी टीका शरद पवार यांनी केली. देशाच्या ऐक्यासाठी हे घातक आहे. संसदेत तर मोदी या विषयावर बोललेच नाहीत, 15 ऑगस्टलाही त्यांनी मौनच बाळगले.

निवडणूक चिन्हाची काळजी नाही
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्पन्न झालेल्या परिस्थितीवर निवडणूक आयोगाने आम्हाला नोटीस पाठवली असून आम्ही त्याला विस्ताराने उत्तर दिले आहे. परंतु, शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत सरकारी हस्तक्षेप झाला आणि पुढे काय झाले, हे सर्वांना माहिती आहे. आमच्याही बाबतीत तेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणूक चिन्हाची चिंता नाही, पण निवडणूक आयोगाची कार्य पद्धत पाहून भीती वाटते, असे पवार म्हणाले.

बैठक झाली, पण ती कौटुंबिक होती
पवार कुटुंबाचा मी कुटुंबप्रमुख आहे. त्याच नात्याने अजित पवार मला भेटायला आले होते. ही बैठक कौटुंबिकच होती, असे शरद पवार यांनी सांगितले. अजित पवार परत आले तर त्यांना पुन्हा पक्षात घेणार का, या प्रश्नावर शरद पवार यांनी पक्ष त्याबाबतीत निर्णय घेईल, असे सांगितले.

‘मी परत येईन’ म्हणणारांचे हाल बघितलेत का!
15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी परत येईन’! बहुदा त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे मार्गदर्शन घेतले असावे. ‘मी परत येईन’ असे फडणवीसही म्हणाले होते. पण, आले ते दुय्यम पदावर. त्यामुळे मोदी कोणत्या पदावर मी सांगू शकत नाही, असा जबरदस्त टोलाही शरद पवार यांनी लगावला.

‘त्या’ महिलेच्या तक्रारीवर अजित पवार बोलतील!
गुरुवारी माझी बीडला सभा आहे. मंत्री झाल्यावर तेथे धनंजय मुंडे यांचे जंगी स्वागत झाले. पण, त्यांचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. कुणा महिलेने त्यांच्याविषयी तक्रार केली आहे. पुढे अजित पवार यांची सभा होणार आहे, त्या सभेत या तक्रारीवर ते बोलतील अशी अपेक्षा आहे, असे शरद पवार म्हणाले.

पक्ष, चिन्ह जाण्याची भीती
शिवसेना पक्ष, त्यांचे चिन्ह याबाबतीत मोदी सरकारचा हस्तक्षेप झाला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत निवडणूक आयोगाकडून प्रामाणिकतेची अपेक्षा कशी करणार? निवडणूक चिन्ह, पक्ष जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

पीकपाण्याची परिस्थिती गंभीर
मराठवाड्यासह राज्याच्या बर्‍याच जिल्ह्यांत पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. पाऊसच नसल्यामुळे पीकपाण्याची परिस्थिती अतिशय गंभाrर असून केंद्र आणि राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज शरद पवार यांनी बोलून दाखवली.