सोनिया गांधी, राहुल गांधी यांना ईडीचे समन्स; 8 जूनला चौकशीसाठी बोलावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स पाठवले आहेत. 8 जूनला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस ईडीने दिली आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी आणि रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावले आहेत. हे प्रकरण 2015 मध्ये ईडीने बंद केले होते. सत्ताधारी पक्षाला हे पटले नाही. त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना हटवले आणि त्यांच्या जागी नवीन लोक बसवले, आता त्यांनीच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावले आहेत, असा आरोप अभिषेक मनु सिंघवी यांनी भाजपवर केला.

काही दिवसांपूर्वीच ईडीने ही नोटीस बजावली आहे. सोनिया गांधी 8 जूनला चौकशीसाठी हजर राहतील आणि राहुल गांधी यांना वेळ असेल तर ते देखील जातील. अन्यथा ईडीकडे वेळ मागितला जाईल. कायदेशिरपणे सर्व प्रश्नांना उत्तरे दिली जातील, असेही अभिषेक मनु सिंघवी म्हणाले.

सुजरेवालांचा गंभीर आरोप

पत्रकार परिषदेमध्ये रणदीप सुरजेवाला यांनी गंभीर आरोप केला. या सर्व षडयंत्रामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पाळीवर सस्थांचा हात आहे. मोदी सरकार बदला घेण्याच्या भावनेमध्ये आंधळी झाली आहे, असेही सुजरेवाला म्हणाले. नॅशनल हेराल्ड 1942 चा पेपर असून भारत छोडो आंदोलनावेळी ब्रिटिशांनी यावर बंदीही घातली होती. आज याच इंग्रजांच्या हुकुमशाहीचे समर्थन करणाऱ्या विचारधारेची लोक याला दाबण्याचे काम करत आहेत.

लढू आणि जिंकू

ब्रिटिशांच्या अत्याचारांना काँग्रेस घाबरली नाही, त्यामुळे ईडीची नोटीस सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे धैर्य मोडू शकत नाही. आम्ही लढू, जिंकू… आम्ही झुकणार नाही… घाबरणार नाही, असे ट्विट काँग्रेसने केले आहे.