
राज्यसभेचे मावळते उपसभापती पी. जे. कुरियन यांना काँगेसने राज्यसभेची उमेदवारी नाकारल्याने आता राज्यसभेत आणि राष्ट्रीय राजकारणात परतण्याचे कुरियन यांचे दरवाजे बंद झाले आहेत. पावसाळी अधिवेशनात राज्यसभेच्या नव्या उपसभापतींची यथावकाश निवड होईल. मात्र, कुरियन यांनी दाक्षिणात्य असूनही आत्मसात केलेली हिंदी हा कौतुकाचा विषय आहे. सुरुवात तोडक्या मोडक्या हिंदीत करणारे कुरियन त्यांची टर्म संपता संपता हिंदीत चांगलेच स्थिरावले. अर्थात उच्चारणाच्या बाबतीत त्यांच्याकडून अनेकदा गोंधळ होत असल्याने राज्यसभेत हास्याची कारंजी उडायची.
केंद्रातले एक मंत्री संतोषकुमार गंगवार यांच्या आडनावाचा उल्लेख, कुरियन गॅंगवार असा करत. एके दिवशी गंगवार यांनी आसनावरून उठून, ‘सभापती महोदय, पहले से तो राजनैतिक लोगों के बारे में लोगों के मन मे गलतसलत विचार आते है और आप मेरा सरनेम गॅंगवार ऐसा बोल रहे है, कृपया इसे ठीक करे नही तो मेरे राजनैतिक करिअर के साथ गैंगवार हो सकता है’, असे सांगितल्यानंतर सभागृहात हास्याचे फवारे उडाले होते. काँगेस पक्षाच्या अंतर्गत राजकारणात कुरियन यांच्या उमेदवारीला केरळातून मोठा विरोध झाला. माजी मुख्यमंत्री ओमेन चांडी यांनी कुरियन यांचा पत्ता कट करत, मणी काँग्रेसला ही जागा बहाल केली. त्यामुळे गेली अनेक वर्षे दिल्लीच्या राजकारणात ठाम मांडून बसलेल्या कुरियन यांची राज्यसभेसोबतच राजकीय कारकिर्दीची सद्दीही संपल्याचे मानले जात आहे. राज्यसभेचे सभापती दाक्षिणात्य व्यंकय्या नायडू असल्याने आता उपसभापतीपद उत्तरेला मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, राज्यसभेतले संख्याबळाचे गणित व राजकारण लक्षात घेता बिजू जनता दल किंवा तृणमूल काँगेससारख्या पक्षांचीही लॉटरी लागू शकते.






























































