
गुन्ह्याची शिक्षा भोगणाऱ्या आईसह विनाकारण कारागृहाच्या चार भिंतीआड राहणाऱ्या चिमुकल्यांना आता पोलादी पिंजरा सोडून मोकळ्या वातावरणात बालपण जगता येणार आहे. या मुलांना आपले बालपण मनसोक्त जगता यावे, त्यांच्या बालमनावर सकारात्मक परिणाम होऊन योग्य दिशेने वाटचाल व्हावी यासाठी कारागृह विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी राज्य कारागृह विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर कारागृहात नवनवीन उपकम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी कैदी महिलांच्या चिमुकल्यांसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अशा बालकांसाठी भायखळा महिला कारागृहाबाहेर ‘नन्हे कदम बालवाडी’ व ‘हिरकणी कक्ष’ तयार केला आहे. त्याचे उद्घाटन आज अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते झाले. यावेळी दक्षिण विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई तसेच नितीन वायचळ, पल्लवी कदम आदी उपस्थित होते. राज्यात प्रथमच कारागृहाबाहेर कैदी महिलांच्या बालकांसाठी बालवाडी सुरू करण्यात आली आहे. सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत बालकांना बालवाडीत ठेवण्यात येईल. तिथे सर्वसामान्य बालकांप्रमाणे त्यांचा सांभाळ होईल, त्यांना शिक्षणाची गोडी लावली जाईल. विशेष म्हणजे कैदी महिलांच्या पाल्यांसोबत कारागृहाच्या महिला कर्मचाऱयांच्या लहान बालकांना ठेवण्यात येणार आहे.
राज्यात पहिल्यांदाच कैदी महिलांच्या बालकांसाठी कारागृहाबाहेर बालवाडी सुरू केली आहे. यामुळे जास्तीत जास्त वेळ बच्चेपंपनी चार भिंतीऐवजी तेथील मोकळय़ा वातावरणात राहतील. बालकांची सकारात्मक वाटचाल होईल आणि भविष्यात त्याचा त्यांना चांगल्या प्रकारे फायदा होईल.
– अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक (कारागृह)
































































