शिक्षिकेकडे केली शरीरसुखाची मागणी, गटशिक्षणाधिकारी निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षिकेचा विनयभंग करून शरीरसुखाची मागणी केल्याच्या तक्रारीवरून सातारा तालुक्याचा गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ याच्यावर शिक्षण विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी ही माहिती दिली.

सातारा जिह्यातील एका शिक्षिकेला वारंवार त्रास देऊन तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत धुमाळ याने तिच्या शाळेवर सतत भेटी दिल्या होत्या. शाळा तपासणीच्या नावाखाली तिला त्रास दिला जात होता. संबंधित शिक्षिकेला कारवाईची भीती दाखवून शरीरसुखाची मागणी धुमाळ याने केल्याची लेखी तक्रार संबंधित शिक्षिकेने जिल्हा परिषदेकडे केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी 14 जूनला विशाखा समितीला पत्र पाठवून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

मात्र, पंचायत समितीच्या विशाखा समितीकडून काहीच हालचाल न झाल्याने पीडित महिलेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुह्यात धुमाळ यास अटक केली होती. न्यायालयाने जामिनावर मुक्तता करताच जिल्हा परिषदेने धुमाळ यांना 15 जुलैपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवले होते. या प्रकरणाची गौडा, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी शासनाकडे अहवाल पाठवला होता. त्यानुसार धुमाळ यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.