नगर महापालिकेतील अधिकाऱ्यांना अतिरिक्त पदभार दिल्याने कामकाजावर परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त कारभाराचा विषय काही थांबायला तयार नाही. नगर महानगरपालिकेमध्ये कर संकलन अधिकाऱ्यांना थेट राहुरी नगरपरिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे. तर शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी यांना बाहेर तालुक्यातील शिक्षण अधिकाऱ्यांच्या पदभार दिल्यामुळे नगर महानगरपालिकेच्या कामकाजावर आता चांगलाच परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांची चांगलीच ओढाताण सुरू झाली आहे. याबाबत शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराडे यांनी आपण जनतेची कामे लवकर व्हावी, याकरता नियोजन करतो. मात्र, अशा प्रकारचा कारभार होणार असेल तर याचा जाब आयुक्तांना विचारणार असल्याचे सांगितले.

महानगरपालिकेमध्ये नव्याने अनेक पदांची निर्मिती झालेली आहे. काही पदे महानगरपालिकेला नव्याने मंजूर झाली आहेत. सहाय्यक आयुक्त त्यानंतर आता मूल्य निर्धारक संकलन अधिकारी पद उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला दिले जाते. सध्या हे काम सचिन बांगर यांच्याकडे देण्यात आले आहे. विशेष म्हणजे बांगर यांच्याकडे हे काम देण्यात आल्यानंतर त्यांच्यावर नगर शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या राहुरी तालुक्याच्या नगर परिषदेमध्ये त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी असा प्रभारी कामकाजाचा कार्यभार दिला आहे. त्यामुळे त्यांची सध्या ओढाताण सुरू झाली आहे. तसेच महानगरपालिकेमध्ये अनेक कामे अशा अडचणीमुळे प्रलंबित राहत आहेत.

शिक्षण विभागामध्ये प्रशासन अधिकारी म्हणून थोरात यांची नवीनच नियुक्ती झाली आहे. त्यांच्याकडे महानगरपालिकेतील शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी म्हणून कार्यभार देण्यात आला होता. त्यांना आता राहुरीसह इतर तालुक्यातील शिक्षण विभागाचा पदभार देण्यात आल्यामुळे पुन्हा हा विषय चांगलाच चर्चेत आला आहे. एकंदरीतच महानगरपालिकेच्या आस्थापनावर हे दोन्हीही अधिकारी सध्या कार्यान्वित आहेत. मात्र त्यांना दुसऱ्या तालुक्यामध्ये अतिरिक्त पदभार एकच सावळा गोंधळ आता पुढे आला आहे. या संदर्भामध्ये महानगरपालिकेचे आस्थापना विभागाचे प्रमुख अशोक साबळे यांच्याशी संपर्क साधला असता हे दोन्हीही अधिकारी आमच्या आस्थापना पदावर असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

याआधी महानगरपालिकेमध्ये अनेक पदभार एकमेकांच्या अधिकाऱ्यांकडे दिले आहेत. काहींना प्रभाग अधिकारीच काम आहे. तर काहींना आस्थापनासह वेगवेगळ्या सूचीवर अतिरिक्त कामकाजाचा भार सुद्धा देण्यात आला आहे. आजही नगर महानगरपालिका नऊ अधिकारी यांच्यापैकी काहीजण हे प्रभारी म्हणून सध्या वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत. किमान त्यांच्याकडे काम दिले आहे, पण नव्याने आता हे पद भरणे गरजेचे आहे. जेणेकरून आस्थापना योग्य पद्धतीने हाताळून जनतेची कामे मार्गी लागतील यासाठी नियोजन होणे गरजेचे आहे. अन्यथा अतिरिक्त कामामुळे सर्वच कामे रखडण्याची शक्यता आहे.

अतिरिक्त कामामुळे गोंधळ
या संदर्भात शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराडे म्हणाले वास्तविक पाहता महानगरपालिकेला अनेक पदे मंजूर झाली आहेत. त्यामुळे पूर्णवेळ अधिकारी देणे गरजेचे आहे. तसेच अधिकाऱ्यांना दिलेले काम त्यांनी निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांची आहे. मात्र आता असाच अतिरिक्त कारभार दिल्यामुळे सगळाच गोंधळ उडाला आहे. त्यामुळे जनतेची कामे होत नाहीत. या संदर्भामध्ये आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्याकडे निश्चितपणे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महानगरपालिकेमध्ये उच्च दर्जाचे अधिकारी आहेत किंवा जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे अतिरिक्त कारभार सुद्धा देण्यात आला आहे. त्यामुळे त्या त्या विभागांची सुद्धा ओढाताण होऊ लागल्यामुळे पालिकेचा कारभार सध्या प्रभारी राज असल्याचे पुन्हा पाहायला मिळत आहे.