रोज अंडे खाणं मधुमेहींना ठरतं घातक, चीन मेडिकल युनिव्हर्सिटी आणि कतार युनिव्हर्सिटीचा अभ्यास

अंडं खाणं बहुतांश जणांना आवडतं. अंडय़ामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. डॉक्टरच दररोज एकवेळ अंड खाण्याचा सल्ला देतात. जास्त अंडी खाणे मधुमेही लोकांसाठी हानिकारक ठरू शकते, हे आपणास माहीत आहेच. चायना मेडिकल युनिव्हर्सिटी आणि कतार युनिव्हर्सिटीने केलेल्या नव्या अभ्यासात असं आढळलंय की दिवसाला एक किंवा अधिक अंडी खाल्ल्याने मधुमेहींमध्ये धोका 60 टक्के अधिक वाढतो. याबाबतचे संशोधन नुकतेच ब्रिटीश जर्नल ऑफ न्यूट्रीशनमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगातील 6 टक्के लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. गेल्या दशकभरापासून तर हे प्रमाण दुप्पट झाले आहे. अंडी खाणे आणि मधुमेह यावर बऱयाचदा वाद होतात. दीर्घकाळ घेतलेला अंडय़ाचा आहार आणि मधुमेह होण्याच्या जोखमीचे मूल्यांकन करणे हे संशोधकांचे लक्ष्य असल्याचे डॉ. ली यांनी सांगितले.
काय सांगतो अभ्यास

संशोधकांनी 8 हजार 545 चिनी नागरिकांचा अभ्यास केला. त्यांचे वय साधारण 50 वर्षे होते. त्यांनी 1991-93 या कालावधीत दिवसाला 16 ग्रॅम एवढया प्रमाणात अंडय़ाचे सेवन केले होते. हे प्रमाण 2000-04 साली 26 ग्रॅम आणि 2009 साली 31 ग्रॅम झाले आहे. ज्यांच्या शरीरात अंडय़ाचे दिवसाचे प्रमाण 38 ग्रॅमपेक्षा जास्त आहे. त्यांच्यामध्ये मधुमेहाची जोखीम 25 टक्के आढळली आहे. जर ज्यांनी अंडय़ाचे सेवन दिवसाला 50 ग्रॅमपेक्षा जास्त केलंय, त्यांच्यात मधुमेहाची जोखीम 60 टक्क्यांनी वाढलेय, असे संशोधकांना आढळले.

आपली प्रतिक्रिया द्या