कोरोना रुग्णांना मिळणार पौष्टिक आहार, मनपाच्या कोविड सेंटरमध्ये आठवडय़ातून तीनवेळा मांसाहार; नाष्ट्यात रोज अंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर महापालिकेची कोविड केअर सेंटर तसेच क्वारंटाइन सेंटरमध्ये असलेल्या कोरोना रुग्णांना आठवडय़ातून तीनवेळा मांसाहारी भोजन आणि दररोजच्या नाष्टय़ात अंडी देण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी दिली आहे.

सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या विविध रुग्णालयांत 3763 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये महापालिकेच्या कोविड सेंटरचाही समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांना निकृष्ट जेवण दिले जात असल्याची तक्रार रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी केली होती. विविध पक्षांच्या नगरसेवकांनी हा मुद्दा लावून धरल्यानंतर आयुक्त पी. शिवशंकर यांनी जेवणाचा ठेकेदार बदलण्याचा निर्णय घेतला होता.

सिंहगड कॉलेज, म्हाडा बिल्डिंग, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, वाडिया हॉस्पिटल, पोलीस प्रशिक्षण केंद्र, केगाव, सोलापूर विद्यापीठ, भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज या ठिकाणी महापालिकेने कोरोना रुग्णांची सोय केली आहे. आयुक्त शिवशंकर यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी याठिकाणी भेट देऊन ठेकेदारांकडून पुरवण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा त्याचे प्रमाण तसेच पदार्थांची तपासणी केली. याशिवाय कोविड सेंटरमधील स्वच्छतेचीही पाहणी केली.

नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या मक्तेदारांनी यापुढे कोविड सेंटर व क्वारंटाइन सेंटर येथील रुग्णांसाठी आठवडय़ातून बुधवार, शुक्रवार, रविवार असे तीन दिवस मांसाहारी जेवण देण्यात यावे, अशी सूचना खोराटे यांनी केली. दररोजच्या नाष्टय़ासोबत उकडलेले अंडे देण्यात यावे असेही सांगितले. जे मक्तेदार आदेशाप्रमाणे जेवण व्यवस्थित देत नाहीत किंवा कमी प्रमाणात देतात त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी दिला.

शहरातील विविध कोविड केअर सेंटर आणि क्वारंटाइन सेंटरलाही खोराटे यांनी भेट दिली. महापालिकेने याठिकाणी केलेल्या व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली. ज्या सेंटरवर डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, अशा ठिकाणी त्यांची नेमणूक त्वरित करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले. खोराटे यांनी सिंहगड कोविड केअर सेंटरमधील रुग्णांशी संवाद साधला. त्यांची विचारपूस केली आणि मिळणाऱ्या सुविधांबाबत माहिती घेतली. यावेळी रुग्णांनी महापालिकेची चांगली व्यवस्था असल्याचे सांगितले. कांही दिवसांपूर्वी जेवण निकृष्ट देण्यात येत होते. पाणीही मिळत नव्हते, पण गेल्या दोन दिवसांपासून आम्हाला देण्यात येणारे जेवण हे व्यवस्थितपणे असून यापुढे असेच जेवण देण्यात यावे, अशी अपेक्षा रुग्णांनी व्यक्त केली. यावेळी सनियंत्रण अधिकारी सहायक आयुक्त विक्रम पाटील, नगर अभियंता संदीप कारंजे उपस्थित होते.

प्रभावी उपाययोजना करून कोरोनाला रोखा – महापौर यन्नम

सोलापूर शहरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढले असून, या जीवघेण्या आजाराचा संसर्ग कमी होण्यासाठी प्रभावी उपाययोजना लवकरात लवकर करा, असे आदेश महापौर श्रीकांचना यन्नम यांनी प्रशासनाला दिले. सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्येतही भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांनी बैठक बोलावली होती. सभागृहनेते श्रीनिवास करली, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त धनराज पांडे, आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते बैठकीला उपस्थित होते.

सोलापूर महापालिका कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये अव्वल

n कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या किमान 25 जणांचा शोध घेण्याचे आदेश आरोग्य विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात सोलापूर महापालिका सध्या अव्वल आहे. महापालिकेने बाधित व्यक्तींच्या संपर्कातील 76.40 टक्के व्यक्तींचा शोध घेतला आहे. ग्रामीण व नागरी भागात पंढरपूर तालुका 72.72 टक्के अव्वल आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये सोलापूरच्या ग्रामीण व नागरी भागात सात हजार 659 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. एका व्यक्तीच्या संपर्कातील 25 जण याप्रमाणे एक लाख 91 हजार 475 जणांचा शोध अपेक्षित होता. प्रत्यक्षात मात्र 75 हजार 175 व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. ग्रामीण व नागरी भागातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम 39.26 टक्के आहे.