देवरूख नगरपंचायत निवडणुकीत १८ जागेसाठी ७० उमेदवार रिंगणात; नगराध्यक्षपदासाठी ५ तर, नगरसेवक पदासाठी ६५ उमेदवार

संगमेश्वर तालुक्यातील नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी नगराध्यक्षपदाचा १ तर नगरसेवक पदाच्या ७ अशा एकूण ८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता नगराध्यक्षपदासाठी ५ व नगरसेवक पदासाठी ६५ असे एकूण ७० उमेदवार निवडणुक रिंगणात उभे राहिले आहेत. दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी आणि १७ प्रभाग असे मिळून १८ जागांसाठी तब्बल ७० उमेदवार निवडणुक रिंगणात उभे असल्यामुळे ही निवडणुक चुरशीची होणार आहे.

तालुक्यातील एकमेव नगरपंचायत ही देवरूखची असल्याने देवरूखमध्ये नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने ऐन थंडीत देवरूखमधील राजकीय वातावरण एकदम गरम झाले आहे. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी या निवडणुकीसाठी किती उमेदवार निवडणुक रिंगणात उभे आहेत, हे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसहीत अपक्ष उमेदवार प्रचाराची राळ उडवण्यास सज्ज झाले आहेत. खरेतर काही राजकिय पक्षांच्या उमेदवारांनी घरोघरी भेटी देत प्रचार सुरूदेखील केला आहे.

नगराध्यक्ष पदासाठी श्रेया संतोष केदारी (अपक्ष) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर नगरसेवक पदासाठी प्रभाग २ मधून संतोष कृष्णा केदारी अपक्ष, प्रभाग १० मधून सुरज सतीष रेडीज अपक्ष, प्रभाग ३ मधून अर्चना विकी कदम, प्रभाग १६ मधून सुभाष बारक्या कोटकर, वसंत रामचंद्र तावडे, मनोज लाल्या तावडे, अजय विजय गजबार या सर्व अपक्ष उमेदवारांनी शुक्रवारी अखेरच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता नगराध्यक्षपदासाठी महायुतीकडून भाजपच्या मृणाल शेट्ये, महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सबुरी थरवळ, आपकडून दिक्षा खंडागळे, अपक्ष स्मिता लाड व अपक्ष वेदीका मोरे असे एकूण ५ उमेदवार नगराध्यक्षपदासाठी निवडणुक रिंगणात आहेत.