
सामना ऑनलाईन । पुणे
शंभरहून अधिक परदेशी धावपटू आणि देशभरातील 15 हजारांहून अधिक धावपटूंचा सळसळता उत्साह…भल्या पहाटेचे आल्हाददायक वातावरण…नवीन सुटसुटीत मार्ग…मात्र ‘मॅरेथॉन मॅन’ कै. प्रल्हाद सावंत यांच्या अनुपस्थितीमुळे भावनिकतेची किनार असलेल्या…आणि देशातील मॅरेथॉनची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱया 33 व्या डॉ. बी. व्ही. राव पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये गतवर्षीप्रमाणे यंदाही इथिओपियन धावपटूंचाच बोलबाला बघायला मिळाला. पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये इथिओपियन धावपटूंनी पहिले तिन्ही क्रमांक पटकावून निर्भेळ यश संपादन केले. प्रथमच परदेशातील मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या आणि सलूनचे दुकान चालवणाऱया झिके अटलाव डेबेडने ही 42 किलोमीटरची शर्यत जिंकण्याचा पराक्रम केला. तब्बल आठ वर्षांनंतर पुन्हा समावेश करण्यात आलेली महिलांची पूर्ण मॅरेथॉन केनियाच्या पास्कालिया चेपकोगेई हिने जिंकली, मात्र दुसऱया व तिसऱया क्रमांकावर इथिओपियन धावपटूंनीच बाजी मारली.
देशातील मॅरेथॉनच्या जन्मभूमीत यंदाची पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सारसबागेजवळील बाबूराव सणस मैदानाच्या कोपऱयावरून रविवारी भल्यापहाटे 5 वाजता सुरू झाली. माजी खासदार आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टचे चेअरमन सुरेश कलमाडी यांच्या हस्ते मुख्य शर्यतीला झेंडा दाखविण्यात आला.

























































