उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
eknath-khadse

भाजप नेत्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पाडापाडीच्या राजकारणावरून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मागील काही दिवसांपासून नाराज आहेत. दोनच दिवसांपूर्वी वारंवार अन्याय, अत्याचार होत राहिल्यास वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा देणाऱ्या खडसे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली.

एकनाथ खडसे यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पत्रकारांनी एकनाथ खडसे यांनी गराडा घातला आणि भेटीसंदर्भात माहिती विचारली. यावेळी बोलताना खडसे म्हणाले की, काल दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आमच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. माझ्या मतदारसंघातील दोन सिंचन योजनांना केंद्र सरकारने कालच मान्यता दिली आणि त्यासाठी मला मंत्रिमंडळाच्या शिफारसीची गरज आहे. ही शिफारस मिळवून देण्यासाठी शरद पवारांनी तातडीने मदत करावी अशी विनंती करण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो होतो. याच अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असेही खडसे म्हणाले.

दोन्ही सिंचन प्रकल्पांना साडेसहा हजार कोटी रुपये लागणार आहेत आणि केंद्र सरकार यासाठी पैसा उपलब्ध करून देण्यास तयार आहे. आपल्या शिफारसीनंतर यास गती येईल, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली, व त्यांनी यास मान्यताही दिली. प्रकल्पासाठी मदत करून असे आश्वासन त्यांनी दिले, असे एकनाथ खडसे म्हणाले.

स्वपक्षावर निशाणा
तसेच या भेटीदरम्यान 12 तारखेला गोपीनाथ गडावर पंकजा मुंडेंनी स्वाभिमान मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला आम्ही दरवर्षीप्रमाणे उपस्थित राहणार आहोत. पाच वर्षापूर्वी मी मंत्री असताना स्व. गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक संभाजीनगर येथे उभारण्यात यावे यासाठी पशुसंवर्धन व दुग्धविकासाची जागा उपलब्ध करून दिली होती. मात्र मंत्रिमंडळातून बाहेर आल्यापासून ते आतापर्यंत गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक त्या ठिकाणी उभे राहू शकले नाही, असे म्हणत खडसे यांनी पायउतार झालेल्या फडणवीस सरकारवरच निशाणा साधला. गेल्या सरकारमध्ये जे स्मारक उभे राहू शकले नाही, ते आपल्या सरकारमध्ये उभारले जावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे ते म्हणाले.

स्वपक्षीयांनी केली पाडापाडी, एकनाथ खडसेंनी दिले चंद्रकांत पाटील यांना पुरावे