नाथाभाऊंचा वाजतगाजत राष्ट्रवादीत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपला रामराम ठोकल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी समर्थक व कार्यकर्त्यांच्या फौजफाटय़ासह वाजतगाजत राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या प्रवेश सोहळय़ात एकनाथ खडसे यांनी आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडतानाच भाजप नेत्यांना थेट इशाराच दिला.

‘माझ्यामागे ईडी लावाल तर मी सीडी लावेन. थोडे दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतले हे दाखवून देईन,’ अशी तोफच त्यांनी भाजप नेत्यांवर डागली. यावेळी नाथाभाऊंची मुलगी रोहिणी यांनी सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश केला.

राष्ट्रवादीच्या बॅलार्ड पिअर येथील प्रदेश कार्यालयात एकनाथ खडसे यांच्या प्रवेशासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. खडसे यांचे कार्यकर्ते तसेच भाजपचे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांतील खडसेंचे समर्थकही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीचा गमचा घालून त्यांचे राष्ट्रवादीत स्वागत केले. यावेळी भाषणात एकनाथ खडसे यांनी थेट भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, आयुष्याची 40 वर्षे भाजपच्या उभारणीपासून आतापर्यंत पक्षासाठी काम करीत आलो. ज्या ठिकाणी 40 वर्षे काढली तो पक्ष एकाएकी सोडावासा कधी वाटला नाही; पण मागील चार वर्षांत महाराष्ट्राच्या विधानसभेत माझी किती छळवणूक आणि बदनामी करण्याचा प्रयत्न झाला हे महाराष्ट्राने पाहिले आहे. मी सभागृहात विचारायचो, माझा गुन्हा काय? पण माझ्या प्रश्नाचे उत्तर अद्यापपर्यंत मिळालेले नाही.

मी लेचापेचा नाही!

मी राष्ट्रवादीत यायचे असे म्हणालो तेव्हा जयंत पाटील म्हणाले, तुम्ही आलात तर तुमच्यामागे ईडी लावतील. मी म्हणालो, त्यांनी मला ईडी लावली तर मी सीडी लावेन. मी काही लेचापेचा नाही, असा निशाणा त्यांनी भाजप नेत्यांवर साधला.

ओझे गेल्यासारखे वाटतेय; हलके हलके वाटतेय

भाजपमध्ये असताना जळगावमधील 100 टक्के जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका जिंकून येत होत्या. हेच चित्र पुढच्या कालखंडात राष्ट्रवादीबाबत असेल. जळगाव जिह्यात मोठा कार्यक्रम घेऊ. नाथाभाऊंची ताकद काय आहे हे दाखवून देईन. जळगावचे सागरपार्क ओतप्रोत भरून दाखवेन. वर्षभराच्या आत या ठिकाणी नक्की बदल दिसेल असे सांगतानाच एकनाथ खडसे यांनी, आज माझ्या डोक्यावरून ओझं गेल्यासारखं वाटतंय, हलकं हलकं वाटतंय, अशी भावनाही व्यक्त केली.

तुम्ही सकाळी 5 वाजता मीटिंग घेऊन शपथ घेतली तेव्हा तुमची नीतिमत्ता कुठे गेली? राष्ट्रवादी तुम्हाला सकाळी 5 वाजता चांगला वाटला होता. मला त्यापेक्षा चांगला वाटला, असा टोलाही खडसे यांनी फडणवीसांचे नाव न घेता लगावला.

40 वर्षांत कधीही पाठीत खंजीर खुपसला नाही

संघर्ष करणे हा माझा स्थायी स्वभावच आहे. भाजप कशात नव्हती त्या कालखंडापासून भाजपचे काम करीत आलो. उत्तर महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या 10 निवडणुकांत 17 खासदार निवडून दिले आहेत. राजकारणात समोरासमोर नडलो, पण विद्वेषाची भावना ठेवली नाही. कधी पाठीत खंजीर खुपसला नाही. पण भाजपने मला अडगळीत टाकले. माझे राजकारणच संपवण्यात आले होते. रोहिणीताईंना तिकीट दिले तेही जबरदस्तीने. मी मागितले नव्हते.

नाथाभाऊंना एवढे दिले असे म्हणतात, पण नाथाभाऊने उभी हयात तुमची सेवा केली त्याचे काय. एवढे करूनही मला काय दिले, तर माझ्यामागे ऍण्टीकरप्शन, इन्कम टॅक्स आणि महिला मागे लावली. 40 वर्षांत महिलेला समोर ठेवून मी कधी राजकारण केले नाही. कुणाला समोर ठेवून राजकारण करण्याचा माझा स्वभाव नाही, असा टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला.

दिल्लीतील वरिष्ठांनी सांगितले, एनसीपीत जा!

राष्ट्रवादीत येण्याआधी मागील सहा महिने चर्चा करीत होतो. कार्यकर्त्यांकडून एनसीपीत प्रवेश करा असे सांगितले जात होते. तिकडे दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, नाथाभाऊ तुम्हाला आता या पक्षात भविष्य नाही. एनसीपीत जा असे त्यांनीच सांगितले. भाजपमध्ये आजही असे अनेक लोक आहेत ज्यांना दुसऱ्या पक्षात जावेसे वाटत आहे; मात्र ईडी मागे लावतील याची त्यांना भीती आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले.

थोडं थांबा, कोणी किती भूखंड घेतले उघड करतो!

भाजपने दिलं त्याबद्दल आभार, पण छळलं त्याचं काय? विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला. इतक्या खालचं राजकारण चालत असेल तर इथे राहणं योग्य नाही हे समजलं. दोन वेळा ऍण्टीकरप्शन, नाशिक आणि पुण्याकडूनही लावली. भूखंडाच्या चौकश्या लावल्या, असे सांगतानाच काही दिवस जाऊ द्या, कोणी किती भूखंड घेतले ते दाखवू. नाथाभाऊ कुणाचे घेणाऱ्यातला नाही, पण नियमाबाहेर ज्यांनी केलं ते मागणाऱ्यातला आहे, अशा शब्दांत खडसे यांनी भविष्यात भाजप नेत्यांना कसे अडचणीत आणणार याचा इशाराच दिला.