
सत्ता गेल्याने देवेंद्र फडणवीस यांची अवस्था काय झाली आहे, हे त्यांचा चेहराच सांगत आहे. ते अस्वस्थ आहेत. भाजपमधून कुणी दुसरीकडे जाऊ नये, यासाठी ते सातत्याने आमचे सरकार येणार असल्याचे सांगत असल्याचा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत लगावला. दरम्यान, माझ्यावरही गंभीर आरोप झाले. माझ्याबाबतीत जसे राजकीय षडयंत्र रचले गेले, तसेच आता गृहमंत्र्यांबाबत रचले जात आहे. एखाद्याला बदनाम करण्याची फडणवीस यांची जुनीच पद्धत असल्याचेही ते म्हणाले.
एकनाथ खडसे म्हणाले, काही आरोप राजकीय दबावापोटी केले जातात. परमवीर सिंग यांनी बदली होण्याआधी आरोप केले असते, तर त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले असते. बदलीनंतर एखाद्याने केलेले आरोप आकसापोटी केलेले असतात. परमवीर सिंग यांच्याबाबतही अनेक तक्रारी पुढे येत आहेत. पोलिसांच्या बदल्या करण्याचा अधिकार गृहमंत्र्यांना नाही, तर आस्थापना मंडळाकडून या बदल्या केल्या जातात.
देवेंद्र फडणवीस सतत दिल्लीला जात आहेत, राज्यपालांना भेटत आहेत, याबाबत विचारले असता खडसे म्हणाले, वरून जर एखाद्याचा कार्यक्रम करायचे ठरले असेल, तर त्याची पद्धत देवेंद्र फडणवीस ठरवतात. मी महसूलमंत्री असताना माझ्यावर आक्षेप घेतले गेले. आत्ताही तीच पद्धत सुरू आहे. कुणीतरी एखादा छोटा आरोप करतो, त्या आरोपाची चौकशी करण्याची मागणी केली जाते. यानंतर दुसरा, तिसरा असे आरोप होत जातात. एखाद्याला बदनाम करण्याची फडणवीसांची ही जुनीच पद्धत आहे. मलाही सलग 20 दिवस बदनाम करण्यात आले. हे कुणी सांगितल्याशिवाय झाले आहे का, असा सवालही त्यांनी केला.
सरकार गेल्यापासून देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत. सत्तेत येण्यासाठी ते अधीर आहेत. मात्र, 171चे बहुमत असताना त्यांची सत्ता येणे अवघड आहे. राज्य सरकारला बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे. आपले आमदार फुटू नयेत यासाठी सत्ता येणार असल्याचे सांगितले जात आहे, असेही एकनाथ खडसे म्हणाले.
योग्य वेळी सीडी लावणार
– माझ्यावर आरोप करणाऱयांना मी योग्य वेळेला उत्तर देणार आहे. तुमच्याकडे ईडी आहे, तर माझ्याकडे सीडी आहे, हे मी आधी बोललो आहे. योग्य वेळ आल्यानंतर सीडी लावणार असल्याचेही एकनाथ खडसे यांनी सांगितले.


























































