पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील लोकांमुळे – एकनाथ खडसे

3169

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली. दोघांमधील बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी स्वपक्षावरच तोफ डागली आहे. ‘पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव काही पक्षविरोधी, पक्षाच्या अंतर्गत विरोधी लोकांमुळे झालेला आहे. ज्यांनी ज्यांनी पक्षविरोधी काम केले आहे, अशांची नावे मी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिलेली असून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे’, असे एकनाथ खडसे म्हणाले.

‘रॉयलस्टोन’वर या पंकजा मुंडे यांच्या बंगल्यावर खडसे आणि मुंडे या दोघांमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाली. यानंतर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, आमची ही भेट कौटुंबिक होती. गोपीनाथ मुंडे आणि मी अत्यंत जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांप्रमाणे होतो. आजच्या बैठकीमध्ये पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव का झाला यावर चर्चा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळामध्ये ज्या कारणांमुळे पंकजा आणि रोहिणी यांचा पराभव झाला ती कारणं वरिष्ठांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि वरिष्ठांनी याची नोंद घेऊन पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी, अशीही चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांच्या पराभवामध्ये पक्षविरोधी काम करणाऱ्यांचा हात आहे असे वाटते का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, निश्चितच. मी कालही हेच सांगितले होते आणि परवाही हेच सांगितले. पंकजाताई आणि रोहिणीताई यांचा पराभव पक्षविरोधी लोकांमुळेच झाल्याचे दिसते. ज्यांनी असे काम केले त्यांच्यावर कारवाईची मागणी आम्ही केली आहे. अशांची नावेही देण्यात आलेली आहेत. तसेच 7 तारखेला जळगाव येथे प्रदेशाध्यक्ष आमि संघटन मंत्री या संदर्भात माहिती घेण्यासाठी येणार आहेत, असेही ते म्हणाले.

पक्षांतर्गत नाराज लोकांची माहितीही वरिष्ठांपर्यंत पोहोचली आहे. दोन्ही जागा पाडण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी अपेक्षा असल्याचे खडसे म्हणाले. यावेळी भाजप ओबीसी नेत्यांना डावलत आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला असता खडसे यांनी दुर्दैवाने हे चित्र खरे दिसत असल्याचे म्हटले.

राज्यात ओबीसी नेतृत्व करणाऱ्या नेत्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांना तिकीट नाकारण्यात आले, तर प्रकाश मेहता, रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. यामागील कारणांचा आम्ही तपास घेऊ. मात्र जर निट रचना झाली असती तर 105 पेक्षा अधिक निवडून आले असते, असेही खडसे म्हणाले. तसेच या पराभवाची जबाबदारीही कोणीतरी घ्यायला हवी. पक्ष म्हणून नाही, तर नेतृत्व करणाऱ्यांनी ही जबाबदारी घ्यायला हवी असे म्हणत खडसे यांनी फडणवीस यांच्याकडे इशारा केल्याचे दिसते.

भाजपमध्ये नाराजांची मोट बांधली जात आहे का? असाही सवाल त्यांना करण्यात आला. याला उत्तर देताना खडसे म्हणाले की, नाराजांची मोट बांधण्याची आवश्यकता नसते, पक्षातील नाराज आपोआप एकत्र होतात असे म्हणत त्यांनी सूचक इशाराही केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहकाऱ्यांचे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेही त्यांनी अभिनंदन केले.

आपली प्रतिक्रिया द्या