नाथाभाऊ आज करणार सीमोल्लंघन, हातातील ‘घड्याळा’त दुपारी दोनची वेळ जुळवणार

eknath-khadse-phone

एकनाथ खडसे अर्थात नाथाभाऊ आज शुक्रवारी सीमोल्लंघन करतील. दुपारी दोन वाजता त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होईल. कमळाला सोडून हातात ‘घडय़ाळ’ बांधणाऱया नाथाभाऊंनी भाजपला आणखी एक धक्का देण्याची तयारी केली आहे. कारण आज मी एकटाच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असलो तरी भाजपचे 15 ते 16 माजी आमदार माझ्यासोबत मुंबईला येणार आहेत. शिवाय काही विद्यमान आमदारही माझ्यासोबत असल्याचा दावा खडसे यांनी केला आहे.

भाजपचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी आज त्यांच्या मुक्ताईनगरातील फार्महाऊसवर पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा हल्ला चढवला. या प्रकरणात मी एकच बाजू मांडल्याचे फडणवीस म्हणत आहेत. दुसरी बाजू वेळ आल्यावर ते सर्वांसमोर आणणार आहेत. मग गेली साडेचार वर्षे ते कुठे होते? मी गुन्हा काय केला ते विचारत होतो, पण त्यांनी चालढकल का केली, असा सवाल खडसे यांनी फडणवीसांना केला.

न्याय मिळत नसल्यानेच…

मला न्याय मिळाला नाही म्हणूनच मी माझ्या समर्थकांशी चर्चा केली मआणि अखेर पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसला जळगाव भागात नेतृत्वच नसल्याने मी राष्ट्रवादीची निवड केली, असे खडसे म्हणाले. अजित पवार यांच्यासोबत पहाटे शपथ घेतली तर नैतिक आणि आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर अनैतिक हा कोणता न्याय, असा सवालही त्यांनी विचारला.

खडसेंनी काय आरोप केले माहीत नाही – पंकजा मुंडे यांचे कानावर हात

एकनाथ खडसे यांनी कुणावर काय आरोप केले आहेत हे मला माहिती नाही, असे सांगत भाजपच्या राष्ट्रीय महामंत्री पंकजा मुंडे यांनी कानावर हात ठेवले. अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर त्या बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या. मी चार दिवसांपासून पावसाने नुकसान झालेल्या भागात चिखल तुडवत आहे. पण खडसे यांनी पक्ष सोडला याची खंत मला आहे, असे त्या म्हणाल्या.

आता तरी चिंतन करणार का?

भाजपात फडणवीसांची मनमानी असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही निर्णय घेण्यापूर्वी फडणवीसांना विचारावे लागते. आता भाजप ही व्यक्तिगत आहे. एका व्यक्तीने निर्णय घ्यायचा आणि सर्वांनी तो मान्य करायचा असे झाले आहे, असे खडसे म्हणाले. मला न्याय मिळणार नाही अशी खात्री झाल्यानंतर मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा केवळ चंद्रकांत पाटील यांनीच मला जाऊ नका असे आवाहन केले, असे सांगून खडसे म्हणाले, माझ्यासह बावनपुळे, प्रकाश मेहता यांचे तिकीट का कापले, याचे उत्तर फडणवीसांनी आजपर्यंत दिलेले नाही. आम्हाला रीतसर बाजूला सारण्यात आले. अशा पद्धतीने पक्ष सोडावा लागला. आता तरी तुम्ही चिंतन करणार आहात की नाही, असा टोलाही खडसे यांनी फडणवीसांना लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या