
भाजपात पक्ष सांगेल ती जबाबदारी पार पाडायला तयार आहे. पण अचानक मला पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून वगळण्यात आले. कोअर कमिटीतूनही काढून टाकले. एवढेच काय, उत्तर महाराष्ट्रातील कार्यक्रमांतूनही बाजूला ठेवले जात आहे. वारंवार असाच अन्याय, अत्याचार होत राहिल्यास मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला.
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जळगावमध्ये पार पडली. या बैठकीपासून एकनाथ खडसे यांना दूर ठेवत फक्त जळगाव जिह्याच्या बैठकीला बोलविण्यात आले. याबद्दल तसेच वारंवार पक्षाच्या कार्यक्रमातून डावलले जात असल्याबद्दल खडसे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नाराजी व्यक्त केली. खडसे यांना टार्गेट करण्यात येत आहे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यांच्या भावनांचा विचार आपल्याला करावाच लागेल. शेवटी मी माणूस आहे, देव नाही. मलाही भावना आहेत, असे खडसे यांनी सांगितले.
पराभवाचे पुरावे दिले, कारवाईची वाट पाहू
रोहिणी खडसे यांना पक्षातील नेत्यांच्या कारस्थानामुळेच पराभवाला सामोरे जावे लागले. याबाबतचे सर्व पुरावे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिले आहेत, त्यांच्याकडून काय कारवाई होते याची वाट पाहू, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. फेसबुक आणि व्हॉट्सऍप पोस्टसह कागदोपत्री सर्व पुरावे दिले आहेत. प्रदेश अध्यक्षांनी याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे, असे खडसे म्हणाले.
ओबीसी नेतृत्वामुळेच पक्ष मोठा झाला
ओबीसी नेतृत्वावर अन्याय झाला अस मी कधी म्हटल नाही. ओबीसी आणि बहुजन समाजातील नेत्यांकर अन्याय होतोय, अशी राज्यभरातील कार्यकर्त्याची भावना आहे. 2 खासदार आणि 12 आमदार असणाऱया भाजप सारख्या पक्षाला सत्तेपर्यंत पोहचविण्यासाठी बहुजन समाजाने मोठी मेहनत घेतली. ओबीसी नेतृत्वामुळेच पक्ष मोठा झाला आहे. पक्षाचा चेहरा-मोहरा बदलला हे समजून घ्यायला हवे, असे खडसे म्हणाले.
पक्षातून डावलण्यासाठी चौकशीचा ससेमिरा
अनेक वर्षे मी पक्षाशी एकनिष्ठेने काम करत आहे. मला पक्षाने खूप काही दिल आहे. पण आता मला जाणीवपूर्वक टार्गेट केल जात आहे. एकनाथ खडसे स्पर्धेत राहू नयेत म्हणून काही नेत्यांकडून जाणीवपूर्व हे करण्यात येत आहे. मी काहीही केलेले नसताना माझ्यावर आरोप करण्यात आले. मला पक्षातून डावलण्यासाठी काही कारण नसताना चौकशीचा ससेमिरा लावण्यात आल्याचे खडसे म्हणाले.


























































