मिंधे सरकारचा अपयश लपविण्याचा खटाटोप, 1,21,000 नोकऱ्यांचा दिखावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन-तीन नामांकित कंपन्यांमध्ये सुमारे दोन लाख बेरोजगार मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या असत्या. पण राज्यातील मिंधे सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या. त्यावरून टीका होताच गुजरातपेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणू असे सांगणाऱ्या मिंधे सरकारला ते शक्य होत नसल्याने आपले अपयश लपविण्यासाठी सरकारने आज एकाच वेळी अनेक छोटय़ा छोटय़ा कंपन्यांशी करार करून 1 लाख 21 हजार नोकऱ्या राज्यात आणल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. आश्चर्य म्हणजे या कंपन्या आपल्याच राज्यातील आहेत.

राज्यातील 44 नामांकित उद्योजक, कॉर्पोरेट संस्था, औद्योगिक संघटना, प्लेसमेंट एजन्सीज यांच्यासमवेत आज सामंजस्य करार करण्यात आले. या करारामार्फत राज्यातील 1 लाख 21 हजार बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत असा सरकारचा दावा आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजभवन येथील दरबार हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.