
सामना ऑनलाईन । सांगली
‘कश्मीरला देशापासून तोडण्याचा डाव कदापि यशस्वी होऊ देणार नाही’ अशी ग्वाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज तासगाव येथे जाहीर सभेत दिली.
सांगली लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आज सांगली जिह्यात तासगाव येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. कडाक्याच्या उन्हात झालेल्या या सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या सभेला नगरविकास राज्यमंत्री रवींद्र पाटील, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार सुरेश हाळवणकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते, जिल्हा संघटक बजरंग पाटील, भाजपचे लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक शेखर इनामदार, महापौर संगीता खोत उपस्थित होते.
‘सांगली ही वीरभूमी आहे’ असा उल्लेख करून अमित शहा यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. गेल्या पाच वर्षांत नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने केलेल्या विकासकामांचा आढावा घेत शहा म्हणाले, ‘‘देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी पुढच्या वेळीही मोदी यांचेच सरकार येणे गरजेचे आहे. राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या कामी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा हातभार लावला आहे. त्यामुळेच आज महाराष्ट्रात रस्ते, शौचालये, वीज, घरे आणि ‘जलयुक्त शिवार’सारखी मोठी कामे उभी राहिली आहेत. सर्वसामान्य जनतेच्या विकासाला प्राधान्य देणारे शिवसेना-भाजप महायुतीचे सरकार सत्तेवर यावे यासाठी तुमची साथ आम्हाला हवी आहे’’ असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी आमदार अनिल बाबर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांची भाषणे झाली.





























































