लोकसभा- विधानसभा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाला जाग, मतदार यादीबाबत घेतले मोठे निर्णय

लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मतदार यादीतील होणाऱ्या घोळाबाबत अनेकवेळा विरोधी पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र याकडे दुर्लक्षत करण्यात आलं. पण आता निवडणूक आयोगाला जाग आली आहे. यातच मतदार यादीची अचूकता वाढविण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया अधिक सोयीस्कर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तीन मोठे निर्णय घेतले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादीची अचूकता वाढविण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तीन सुधारणा जाहीर केल्या आहेत. यात पहिली सुधारणा म्हणजे मृत्यू नोंदणी डेटा आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने निवडणूक डेटाबेसशी जोडला जाईल. याअंतर्गत मृत्यू नोंदणीबाबतची माहिती थेट केंद्रीय रजिस्ट्रार जनरलकडून मिळवली जाईल. जेणेकरून मतदार नोंदणी अधिकारी मृत व्यक्तींची माहिती वेळेवर मिळवू शकतील. तसेच मतदार यादीतून कमी करू शकतील.

दुसरी सुधारणा म्हणजे आता मतदार स्लिपची डिझाइन बदलून अधिक सुलभ केली जाईल. यावर आता मतदाराचा अनुक्रमांक आणि मतदान स्लिपवरील भाग क्रमांक ठळक अक्षरात लिहिला जाईल, ज्यामुळे मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधणे आणि अधिकाऱ्यांना यादीत त्यांचे नाव शोधणे सोपे होईल.

तिसरी सुधारणा म्हणजे आता सर्व बूथ लेव्हल अधिकाऱ्यांना प्रमाणित फोटो ओळखपत्रे दिली जातील. हे बीएलओ लोकप्रतिनिधीत्व कायदा, 1950 च्या कलम 13 ब(2) अंतर्गत ईआरओद्वारे नियुक्त केले जातात. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्या बैठकीत मार्च महिन्यात याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत.