
बीड जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक विभागाने मोठ्या प्रमाणात खर्च दाखवून लाखो रूपयांचा घोटाळा केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना देण्यात आल्यानंतर नियुक्त करण्यात आलेल्या सहा सदस्यीय पथकाकडून गुरूवारी दुसऱ्यांदा या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती आली होती. यावेळी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांना बोलावून त्यांच्याकडे जवळपास चार तास बंद दाराआड चौकशी करण्यात आली. दरम्यान यामध्ये ज्या तीन तक्रारी करण्यात आल्या त्या तिन्ही तक्रारदारांनी केवळ तक्रार केली आहे. तक्रारीसोबत कसलाही पुरावा जोडलेला नाही. तरीही महसूल प्रशासनातील अधिकारी चौकशीचा देखावा करत आहेत, असा आरोप होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तसेच भोजन यासह स्टेशनरी आदींमध्ये मोठ्या प्रमाणात बिले लावून हा आकडे पुâगविण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये संबंधित गुत्तेदारांना हाताशी धरून कोट्यावधी रूपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप जनआंदोलनाच्या वतीने करण्यात आला होता. सदरील प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेवून आयोगाने विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. दोन महिन्यांपूर्वी तीन सदस्यीय समितीने या प्रकरणाची चौकशी करून आपला अहवाल विभागीय आयुक्तांना दिला होता. परंतू सदरील चौकशी चुकीच्या पद्धतीने तसेच कनिष्ठ अधिकाऱ्यांना धमकी देऊन करण्यात आल्याची तक्रार करण्यात आल्याने पुन्हा गुरूवारी (दि.५) विभागीय आयुक्तांना सहा सदस्यीय समिती चौकशीसाठी पाठविली होती. या समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या नियोजन भवनातील सभागृहात जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यासह निवडणुकीच्या काळात देण्यात आलेल्या ठेकेदारांना बोलावून त्यांच्याकडून याबाबतची माहिती घेतली. ही समिती आपला अहवाल काही दिवसात विभागीय आयुक्तांकडे देणार असून त्यानंतर याबाबत खरा प्रकार समोर येणार आहे.
यांनी केली चौकशी
घोटाळ्याच्या चौकशीसाठी बीडमध्ये आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये हिंगोली जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी जगदीश मनियार (समिती अध्यक्ष), स्वप्नील मोरे, उपविभागीय अधिकारी, पैठण (सदस्य सचिव), राजू नंदकर उपजिल्हाधिकारी, हिंगोली (सदस्य), चेतन पाटील, नायब तहसीलदार, धाराशिव (सदस्य), सचिव धस, सहाय्यक संचालक, संभाजीनगर (सदस्य), राजेंद्र तारो सहा.लेखाधिकारी, संभाजीनगर (सदस्य) आदींचा समावेश होता.
अॅड.देशमुखांसह तीन तक्रारदारांचे म्हणणेही ऐकले
बीड जिल्ह्यातील निवडणूक घोटाळ्यातील चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बैठक हॉलमध्ये झाली. अॅड. अजित देशमुख यांची तक्रार चौकशीविना तशीच पडून होती. यावर आयुक्तांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सहा सदस्यीय चौकशी समिती गुरूवारी बीडमध्ये आली होती. या चौकशी समितीमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातील हे सहा लोक होते. चौकशी समितीने बुधवारी पत्र लिहून गुरूवारी चौकशीकामी अॅड.अजित देशमुख व इतर दोन तक्रारदार यांना बोलावले होते. दोन सत्रांमध्ये समितीने आपले काम केले. यावेळी तक्रार आणि अधिकारी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. समिती येथे काही दिवसात आपला अहवाल विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करणार आहे.

























































