राज्यातील मतदारांच्या संख्येत तब्बल दहा लाखांनी वाढ

396

राज्यातील मतदारांच्या संख्येत तब्बल दहा लाखांनी वाढ झाली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, राज्यातल्या सांगली-कोल्हापूर या पूरग्रस्त भागांत विधानसभेची निवडणूक निश्चित होणाऱ्या वेळापत्रकानुसारच होईल. त्यात कोणत्याही स्वरूपाचा बदल होणार नाही. पूरग्रस्त भागांतल्या बाधितांना मतदानासाठी नव्याने विनामूल्य ओळखपत्रे देण्याचे काम चालू आहे. त्यांच्या मतदानाच्या अधिकाराला कोणतीही बाधा येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ही पत्रकार परिषद केवळ निवडणूक पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी असून निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याशी काहीही संबंध नाही, असे बलदेव सिंग यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी मतदार यादी व इतर विषयांवर सविस्तर माहिती दिली. गेल्या दीड महिन्याच्या काळात साडेआठ लाखांपेक्षा जास्त नवीन मतदारांची मतदार यादीत समावेश झाला. 15 जुलै ते 31 ऑगस्ट या दीड महिन्याच्या काळात 10 लाख 75 हजार 528 नवीन मतदार यादीत समाविष्ट झाले. याच काळात विविध कारणांमुळे 2 लाख 16 हजार 278 मतदार यादीतून वगळण्यात आले. त्यामुळे एवूâण 8 लाख 59 हजार 250 नवीन मतदार यादीत वाढले, असे त्यांनी सांगितले. 15 जुलैला मतदार यादीत एकूण 8 कोटी 85 लाख 86 हजार 961 मतदारांची नोंद होती. त्यात 4 कोटी 63 लाख 27 हजार 241 पुरुष, 4 कोटी 22 लाख 57 हजार 193 महिला मतदारांचा समावेश होता.

नोंदणी अजूनही सुरूच
31 ऑगस्टला मतदार यादी प्रसिद्ध झाली असली तरी अजूनही मतदारांची नोंदणी चालू आहे. विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशन दाखल करण्याच्या दिनांकापूर्वी दहा दिवस आधीपर्यंत मतदारांना आपली नावे यादीत समाविष्ट करता येतील. ऑनलाइन नोंदणीही करता येऊ शकेल. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही ईव्हीएम मशीनबरोबर व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. त्याकरिता पुरेशा संख्येने त्याची उपलब्धता झाली आहे, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या