प्रदूषणमुक्त मुंबईसाठी पालिका अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहने! 15 ऑगस्टपासून शुभारंभ

स्वच्छ-सुंदर, प्रदूषणमुक्त मुंबईसाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या पालिकेने आता अधिकाऱ्यांनाही इलेक्ट्रिक गाड्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबईत विविध ठिकाणी चार्जिंग पॉइंटही सुरू करण्यात येणार आहेत.  पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱया या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ 15 ऑगस्ट रोजी करण्याचे नियोजन असल्याचे पालिकेच्या पर्यावरण विभागाचे उपायुक्त सुनील गोडसे यांनी सांगितले.

मुंबईचे प्रदूषण कमी करण्यासाठी ‘बेस्ट’ उपक्रमातही इलेक्ट्रिक बस आणल्या गेल्या आहेत. याच धर्तीवर यापुढे चारचाकी प्रवासी वाहनांबरोबरच जास्तीत जास्त हलकी मालवाहू वाहनेही पालिका इलेक्ट्रिक प्रकारची विकत घेणार आहे. महापौर, आयुक्तांसह, पदाधिकारी, अधिकारी यांना पालिकेची वाहने दिली जातात. सुमारे 200 च्या आसपास या वाहनांची संख्या आहे. याशिवाय मालवाहतुकीसाठी हलकी व अवजड मालवाहक वाहनेही वापरली जातात. प्रदूषण रोखण्यासाठी आता ही पारंपरिक इंधनाची वाहने कमी करून इलेक्ट्रिक प्रकारची वाहने टप्प्याटप्प्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार मार्च महिन्यात 30 ते 40 चारचाकी प्रवासी वाहने आणि 25 ते 30 हलकी मालवाहक वाहने विकत घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या