
कोरोना महामारी आणि पूरपरिस्थितीमध्ये राज्यातील वीज कामगारांनी जीव धोक्यात घालून काम केले आहे. मात्र व्यवस्थापनाने कामगारांना दिवाळी बोनस देण्याबाबत हात आखडता घेतला आहे. त्याच्या निषेधार्थ राज्यातील सर्व वीज कामगार, अधिकारी 14 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनादिवशी एक दिवसाचा संप करणार असल्याचा इशारा तिन्ही वीज कंपन्यांमध्ये कार्यरत कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघटनेने दिला आहे.
महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणमध्ये 86 हजार कर्मचारी, अधिकारी कार्यरत आहेत. प्रत्येक वर्षी त्यांना दिवाळीच्या आधी आठ दिवस बोनस दिला जात होता. मात्र यंदा कामगार संघटनांनी मागणी करूनही व्यवस्थापन बोनस देण्याबाबत अवाक्षरही काढत नाही. तसेच 2019-20 या आर्थिक वर्षात सुमारे एक हजार कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तरीही बोनस देण्याबाबत कंपन्या टाळाटाळ करत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत उद्यापासून राज्यभर वीज कंपन्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय झाला आहे, तर शनिवारी संप केला जाणार असल्याचे स्टेट इलेक्ट्रिसिटी फेडरेशनचे सरचिटणीस पृष्णा भोयर यांनी सांगितले.
























































