
दादर आणि माहीम परिसरातील काही भागात गुरुवारी सकाळपासून विजेचा लपंडाव पाहायला मिळाला. 12 तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिक उकाडय़ाने हैराण झाले होते. माहीमच्या शीतलादेवी मंदिर परिसरात ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या मोठय़ा तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांनी दिली. काही भागात रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा पूर्ववत होऊ शकला नाही. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत महापालिका प्रशासनाने 7 जनरेटरच्या मदतीने विद्युत पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात सुरू केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पहिल्यांदा वीज गेली, काही वेळाने ती पुन्हा आली. मात्र, सकाळी साडेदहा वाजता पुन्हा एकदा वीज गायब झाली. त्याचा फटका दादर-माहीममधील रानडे रोड, प्लाझा सिनेमा परिसर आणि शिवसेना भवनच्या दोन्ही बाजूंच्या परिसराला बसला. संध्याकाळी काही भागांत वीजपुरवठा सुरळीतपणे सुरू झाला. मात्र काही भागात रात्री उशिरापर्यंत पुरवठा सुरू झाला नव्हता.

























































