
सामना प्रतिनिधी । मुंबई
वर्षानुवर्षे वीज बिल थकवल्याने कनेक्शन कापलेल्या राज्यातील नळपाणी योजनांना पुन्हा वीज मिळणार आहे. राज्यातील 151 तालुक्यांमध्ये सरकारने दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून विजेअभावी बंद असलेल्या नळपाणी योजना पुन्हा वीज कनेक्शन देण्याचे आदेश ‘महावितरण’ला दिले आहेत. त्यानुसार थकबाकीदारांनाही कनेक्शन देण्याचे निर्देश ‘महावितरण’ने विभागीय कार्यालयांना दिले आहेत.
‘महावितरण’चे राज्यातील वीज ग्राहकांकडे सुमारे 40 हजार कोटी रुपये वीज बिलाचे थकीत आहेत. त्यामध्ये सार्वजनिक नळपाणी योजनांकडे अडीच हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्याची वसुली होत नसल्याने ‘महावितरण’ने वीजपुरवठा खंडित केला आहे, मात्र राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने वीज बिल थकीत असलेल्या नळपाणी योजनांच्या थकीत वीज बिलापैकी पाच टक्के रक्कम भरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नोव्हेंबर 2018 पासून जून 2019 पर्यंत दुष्काळी भागातील नळपाणी योजनेचे वीज बिल सरकार मदत व पुनर्वसन विभागाच्या टंचाई निधीतून भरेल असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या आधी वीज बिल थकीत असल्याकारणाने वीजपुरवठा खंडित केलेल्या नळपाणी योजनांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश दिले आहेत.
थकीत वीज बिलाचे काय
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वीज बिल थकबाकीदार नळपाणी योजनांचे पाच टक्के वीज बिल भरून वीज जोडणी देण्याचे निर्देश ‘महावितरण’ला दिले आहेत. तसेच पुढील सात-आठ महिन्यांचे बिलही सरकार भरणार आहे. मग संबंधित नळपाणी योजनांनी वर्षानुवर्षे वीज वापरून थकवलेले वीज बिल कोण भरणार, सरकार त्याची जबाबदारी का घेत नाही असा सवाल ‘महावितरण’च्या एका वरिष्ठ अधिकार्याने केला आहे.


























































