
सामना प्रतिनिधी, मुंबई
कोल्हापूर-सांगली जिह्यातील पुराचे पाणी ओसरू लागताच ‘महावितरण’ने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. त्यानुसार आतापर्यंत कोल्हापूरमधील एक लाख 22 हजार तर सांगलीमधील 38 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे.
चार-पाच दिवसांपासून सांगली-कोल्हापूरमध्ये भरलेल्या पाण्यामुळे महावितरणचे अनेक ट्रान्सफार्मर आणि वीज उपकेंद्रे पाण्याखाली गेली होती. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे ठप्प होता. आता पाणी कमी होऊ लागल्याने महावितरणने वीजपुरवठा सुरू करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी पुणे, बारामती, संभाजीनगर, नांदेड, लातूर, बीडमधून तांत्रिक कर्मचारी आवश्यक ती उपकरणे घेऊन सांगली-कोल्हापूर येथे दाखल झाले आहेत. कोल्हापूर शहरातील प्रमुख 33/11 केव्हीचे दुधाळी वीज उपकेंद्र सुरू करण्यास कर्मचाऱयांना रात्री उशिरा यश आले आहे. तसेच जिल्ह्यातील अन्य सहा उपकेंद्रे सुरू केली आहेत. त्यामुळे एक लाख 22 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू झाला आहे. त्याचबरोबर सांगली शहरातील मिरज जॅकवेल, सांगलीवाडीसह अन्य भागांतील वीजपुरवठा सुरू केल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.



























































