पुतीन यांनीच माझ्या नवऱयाची हत्या केलीय; एलेक्सी नवलनीच्या पत्नीचा गंभीर आरोप

रशियातील विरोधी पक्षनेते एलेक्सी नवलनी यांच्या पत्नीने नवऱयाच्या हत्येला राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांना जबाबदार ठरवले आहे. पुतीन यांनीच माझ्या नवऱयाची हत्या केली आहे, असा गंभीर आरोप नवलनी यांची पत्नी युलिया नवलनी यांनी केला आहे. तीन दिवसांपूर्वी ब्लादिमीर पुतीन यांनी माझ्या नवऱयाला जीवे मारले आहे, त्यांची हत्या केली आहे, असे सांगत माझ्या नवऱयाचे काम मी यापुढेही सुरूच ठेवणार आहे, असा निर्धार युलिया नवलनी यांनी केला आहे. एलेक्सी नवलनी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेल्या 400हून जास्त लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नवलनी यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने रशियातील अनेकांना जबरदस्त धक्का बसला आहे. एलेक्सी नवलनी यांच्याकडून अनेकांना मोठय़ा अपेक्षा होत्या. पुतीन यांच्या सरकारचा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यात नवलनी यांचा हात होता. त्यामुळेच पुतीन यांनी त्यांची हत्या केली, असा आरोप केला जात आहे. दरम्यान, एलेक्सी नवलनी यांच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार, नवलनी यांची गेल्या शुक्रवारी कारागृहात हत्या करण्यात आली आहे; परंतु त्यांचा मृतदेह कुठे ठेवला यासंबंधी अद्याप काही माहिती समोर आली नाही.