जालन्यात मराठा लेकींचा एल्गार मोर्चा; भोकरदनमध्ये ट्रॅक्टर रॅली

सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातील केदारखेडा गावासह पूर्णा नदीकाठच्या परिसरातील जवळपास शंभरच्यावर गावातील मराठा शेतकरी बांधवांनी पाठिंबा दर्शविला आहे. या मोर्चात मराठा शेतकरी कुटुंबातील लेकींनी सहभाग नोंदविला आणि विशेष म्हणजे शेतकरी मराठा बांधवांनी एकत्र येत तब्बल 1 हजार ट्रॅक्टर घेऊन मोर्चाला भव्य रूप आले. ट्रॅक्टर रॅली आणि एल्गार मोर्चा भोकरदन तालुक्यातील केदारखेडा गावातुन सुरु करण्यात आली.

केदारखेडा येथून रॅली भोकरदन शहरात दाखल होताच या भव्य रॅलीचे मराठा बांधवासह इतर समाजबांधवांनी स्वागत केले. रॅली मोर्चा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासुन ते सिल्लोड रोडवरील महात्मा फुले चौकापासून परत छत्रपती शिवाजी महारांजांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी येऊन थांबला. यावेळी सर्वप्रथम मराठा लेकींच्या हस्ते महाराजांना पुष्पहार अर्पण करून आरक्षणाबाबत घोषणा देण्यात आल्या. यावेळी तरुण मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठा, ऊठ मराठा जागा हो आरक्षणाचा धागा हो, आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच, देत कसे नाही घेतल्या शिवाय राहत नाही, यासह सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी तीन मुलींनी मराठा आरक्षणाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी या मोर्चात खास करून तमाम मराठा बांधव सहभागी झाल्याचे दिसून आले.