
एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहा संशयित आरोपींचा जामीन अर्ज बुधवारी विशेष न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला. सुरेंद्र गडलिंग, सुधीर ढवळे, महेश राऊत, शोमा सेन, रोना विल्सन आणि वरवरा राव यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. यावेळी न्यायालयाने सर्व संशयित आरोपी हे बंदी असलेल्या (माओवादी) संघटनेशी संबंधित आहेत. सर्वजण बंदी असलेल्या संघटनेचे सक्रिय सदस्य असून संघटनेची ध्येयधोरणे पूर्ण करण्यासाठी काम करतात असे सांगून हे लोकशाहीसाठी धोक्याचे असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने यावेळी काढला.
न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळताना सर्व संशयित एकमेकांसोबत फोनवर संपर्कात होते. महेश राऊत यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पत्रात कोरेगाव-भीमा येथील दंगलीबाबत उल्लेख सापडला. रोना विल्सन यांच्याकडे मिळालेल्या कागदपत्रांत शस्त्र्ा खरेदीचा उल्लेख मिळाला. आत्मसमर्पण केलेल्या पहाडसिंग या नक्षलवाद्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात अटक करण्यात आलेल्यांच्या कामाबाबतची माहिती सांगितली आहे. सुरेंद्र गडलिंग याने प्रकाश यांना पत्र लिहिले असून त्यात ज्या ठिकाणी पोलिसांची संख्या कमी आहे अशा ठिकाणी हल्ला करावा असे नमूद केले आहे. तसेच गडलिंग नक्षलवाद्यांचे वकील म्हणून काम पाहतात. वरवरा राव यांच्याकडे मिळून आलेल्या कागदपत्रांत माओवाद्यांच्या राजकीय आणि ध्येयधोरणांबाबत भाष्य केलेले सापडले आहे. तसेच त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पेन ड्राइव्हमध्ये शहरी भागातील नक्षलवाद्यांचे काम आदी कागदपत्रे सापडली आहेत. ही सर्व कागदपत्रे, पत्रांचा विचार करून जामीन अर्ज फेटाळला असल्याचे निर्णयात नमूद केले आहे. पुढील सुनावणी 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
तक्रारीत काय म्हटले…
31 डिसेंबर 2017 रोजी शनिवारवाडय़ावर एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव-भीमा येथे दंगल उसळली होती. त्यात एकाला आपला जीव गमवावा लागला होता. यानंतर तुषार दामगुडे याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यात एल्गार परिषदेत करण्यात आलेल्या वादग्रस्त भाषणामुळे कोरेगाव-भीमा येथे दंगल झाल्याचे तक्रारीत नमूद केले होते.
सुधा भारद्वाज, अरुण फरेरा आणि व्हर्नान गोन्साल्विस यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता तो नुकताच फेटाळण्यात आला आहे. वरवरा राव यांचा बुधवारी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने न्यायालयात राव यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांची भेट घेतली.


























































