हॅक होण्याचा धोका, निवडणुकीत EVM चा वापर बंद करा; एलॉन मस्क यांची मागणी

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि SpaceX चे CEO एलॉन मस्क यांनी EVM संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. मस्क यांनी शनिवारी निवडणूक प्रक्रियेतून ईव्हीएम काढून टाकण्याची मागणी केली. याबाबत त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X पोस्ट टाकली आहे.

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन रद्द करण्यात याव्यात. या मशिनींना मनुष्य किंवा AI द्वारे हॅक होण्याचा धोका आहे, जरी हा धोका कमी असला, तरीही खूप जास्त परिणाम होऊ शकतो, असे मस्क यांनी या पोस्टमध्ये म्हंटले आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे दावेदार रॉबर्ट एफ. केनेडी जूनियर यांनी ईव्हीएम मशीन बाबत एक पोस्ट शेअर केली होती. ‘पोर्तो रिकोच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांशी संबंधित मतदानात अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. मात्र पेपर ट्रेल असल्याने ही समस्या पकडली गेली आणि मतांची संख्या दुरुस्त करण्यात आली. पण ज्या भागात पेपर ट्रेल नाही तेथे काय होईल? या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. अमेरिकन नागरिकांना हे माहित असणे आवश्यक आहे की त्यांची सर्व मते मोजली गेली आहेत. असे म्हणून केनेडी ज्युनियर यांनी पोर्तो रिकोच्या निवडणुकीत ईव्हीएमशी संबंधित अनियमिततेबद्दल त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

मस्क यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांच्या या  पोस्टवर प्रतिक्रिया देताना ईव्हीएमने निवडणुका न घेण्याचा सल्ला दिला आहे.

ईव्हीएम म्हणजे काय?

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) हे एक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे जे निवडणुकीत मतांची नोंद आणि मोजणी करण्यासाठी वापरले जाते. मतदान प्रक्रिया सोपी, जलद आणि विश्वासार्ह करणे हा या यंत्रांचा मुख्य उद्देश आहे. हिंदुस्थानात लोकसभा, विधानसभा अशा विविध प्रकारच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर केला जातो. दरम्यान हिंदुस्थानातील EVM ने निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि कार्यक्षम बनवली आहे, ज्यामुळे मतदारांचा आत्मविश्वासही वाढला आहे.