
अमेरिकेचे उद्योगपती एलॉन मस्क यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स जगभरात प्रसिद्ध आहे. मस्क लवकरच आता डिजिटल पेमेंट सर्विस एक्स मनी घेऊन येणार आहेत. याची सर्वात आधी सुरुवात अमेरिकेतून केली जाणार आहे. त्यानंतर बाकीच्या देशात ही सर्विस सुरू केली जाईल. या सर्विसवरून सामान खरेदी करणे, पैसे पाठवणे आणि पेमेंट करणे यासारखे काम केले जातील. यासोबतच कंपनी एक्स डेबिट आणि क्रेडिट कार्ड सुद्धा घेऊन येण्याची तयारी करत आहे. हिंदुस्थानात ही सर्विस कधीपर्यंत सुरू केली जाईल, यासंबंधी अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. हिंदुस्थान एक मोठे डिजिटल मार्केट आहे. त्यामुळे मस्क ही सेवा नक्कीच हिंदुस्थानात सुरू करतील, अशी शक्यता आहे. वेगवेगळ्या कामांसाठी एकच अॅप बनवणे हे मस्क यांचे स्वप्न आहे. चीनमध्ये वूईचॅट एक मल्टी यूज ऍप आहे. यामध्ये चॅटिंग, पेमेंट, बुकिंग आणि शॉपिंग सर्वकाही केले जाते. यासारखेच मस्क अॅप बनवण्याची तयारी करत आहे. एक्सच्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात एक्स पिझ्झाची पेमेंट करण्यापासून स्टॉक ट्रेडिंग, गुंतवणूक आणि डेली शॉपिंगपर्यंत सर्वकाही करता येईल.