
रेपोरेट 0.25 टक्क्यांनी कमी करून रिझर्व्ह बँकेने दसरा-दिवाळी या सणासुदीच्या दिवसांत नागरिकांना दिलासा दिला आहे. त्यामुळे वाहनकर्ज, गृहकर्जावरील ‘ईएमआय’चे ओझे काहीसे कमी होणार आहे. दरम्यान, हा दिलासा देत असतानाच गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी देशाच्या आर्थिक विकासाबाबत चिंता व्यक्त केली आहे. चालू आर्थिक वर्षात 2019-20 मध्ये जीडीपीचा (सकल घरेलू उत्पादन) दर 6.1 टक्क्यांपर्यंत खाली येईल असा अंदाज वर्तविला आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आपले पतधोरण जाहीर केले. सलग पाचव्यांदा रेपोरेट कमी केला आहे. आज यामध्ये 0.25 टक्क्यांनी कपात केली. यामुळे रेपोरेट 5.15 टक्के झाला आहे. रेपोरेटमध्ये कपात झाल्याचा थेट फायदा बँकांकडून ग्राहकांना मिळाला पाहिजे असे रिझर्व्ह बँकेचे आदेश आहेत. त्यामुळे कर्जांचे हप्ते कमी होतील.
गव्हर्नर दास यांना चिंता
रिझर्व्ह बँकेला महागाईची नाही तर विकासाची चिंता आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर दास यांनी म्हटले आहे.
महागाईचा दर 3.5 ते 3.6 टक्के राहील, मात्र जीडीपीचा दर 2019-20 मध्ये 6.1 टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. यापूर्वीचा अंदाज 6.9 टक्के इतका होता.
काय होऊ शकते?
रिझर्व्ह बँकेकडून देशभरातील बँकांना ज्या दराने निधी दिला जातो त्याला रेपोरेट म्हणतात. रेपोरेट कमी केल्यास बँकांना स्वस्त दराने निधी मिळतो. बँकांकडून हे भागभांडवल कर्जरूपाने ग्राहकांना दिले जाते. वाहन कर्ज, गृहकर्जांसह इतर लोनवरील व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे.
सध्या वाहन क्षेत्रासह इतर क्षेत्रांत आर्थिक मंदी आहे. देशात दसरा-दिवाळीसारखे मोठे सण याच महिन्यात आहेत. लोकांकडून खरेदी वाढेल. त्यासाठी स्वस्त दरात कर्ज मिळेल. पर्यायाने बाजारात पैसा येईल असा अंदाज आहे.

























































