ईडीच्या वकिलाचा तडकाफडकी राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ईडीने देशात पुन्हा छापेमारीचा धडाका लावला आहे. याचदरम्यान शनिवारी ईडीचे विशेष सरकारी वकील नितेश राणा यांनी तडकाफडकी राजीनामा देत या केंद्रीय तपास यंत्रणेलाच मोठा झटका दिला. राणा यांनी अनेक हायप्रोफाईल खटल्यांत ईडीची बाजू मांडली होती. त्यामुळे त्यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

राणा हे 2015 पासून ईडीचे वकील म्हणून विविध न्यायालयांत काम पाहत होते. त्यांनी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम, काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार, राजदचे नेते लालूप्रसाद यादव व त्यांचे कुटुंबीय, तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा आदी नेत्यांविरोधातील खटल्यांत ईडीच्या वतीने बाजू मांडली. तसेच विदेशातील न्यायालयांतही आर्थिक अफरातफरीशी संबंधित प्रकरणांत ईडीचे प्रतिनिधित्व केले होते. शनिवारी त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. यामागे वैयक्तिक कारण असल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र गेल्या काही दिवसांत ईडीने पुन्हा छापेमारी सुरू केली असतानाच त्यांनी राजीनामा दिल्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणेसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.