
डिजिटल अरेस्टची भीती घालून अमेरिकन नागरिकांच्या फसवणूक प्रकरणात आता सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) लक्ष घातले आहे. गुरुवारी ईडीच्या अधिकाऱयांनी या प्रकरणाची सखोल माहिती पुणे पोलिसांकडून घेतली. फसवणुकीतून येणारा पैसा परदेशातून हवालाच्या माध्यमातून येत होता. त्या पार्श्वभूमीवर ईडीने माहिती घेतल्याचे समजते.
खराडी येथील एका कॉलसेंटरमध्ये पुणे पोलिसांनी छापा टाकून फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या ठिकाणी तब्बल 123 कर्मचारी कार्यरत होते आणि दररोज एक लाख अमेरिकन नागरिकांचा वैयक्तिक डेटा वापरून फसवणूक केली जात होती. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली असून, आणखी तीन आरोपी फरार आहेत. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी गुजरात आणि राजस्थान येथील असून, त्यांच्या पार्श्वभूमीची चौकशी सुरू आहे. या गुह्याचा तपास अधिक सखोल करण्यासाठी पोलिसांनी सहा विशेष पथके नेमली आहेत. फसवणुकीतून मिळालेला पैसा हवालाच्या माध्यमातून देशात आणला जात होता. हा पैसा नेमका कोठून आणि कसा देशात पोहोचला, याचा शोध पुणे पोलीस घेत आहेत. त्यातच गुरुवारी ईडीचे पथक पुण्यात दाखल झाले. ईडीच्या अधिकाऱयांनी पुणे पोलिसांकडून गुह्याची प्राथमिक माहिती, आरोपींचा इतिहास, जप्त केलेली साधने तसेच आर्थिक व्यवहारांचा सविस्तर आढावा घेतला.






























































