
क्रिकेट सट्टेबाजीचे व्यसन लागलेल्या इंजिनिअरिंगच्या 23 वर्षांच्या विद्यार्थ्याने संपत्तीसाठी आई आणि बहिणीची हत्या केल्याची घटना घडली आहे. नात्याला काळीमा फासणारी ही घटना हैदराबादमध्ये घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. त्याने आई आणि बहिणीच्या जेवणात किटकनाशक मिसळले. तसेच त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वी त्या बेशुद्ध असल्याची खात्री केली. त्यानंतरच त्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्या दोघींचा मृत्यू झाला.
हैदराबादच्या मेधांचलमध्ये ही घटना घडली आहे. पाली साईनाथ रेड्डी या एमटेकच्या दुसऱ्या वर्षांला असलेल्या विद्यार्थ्याला क्रिकेट सट्टेबाजीचे व्यसन होते. त्याचे वडील प्रभाकर रेड्डी यांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्याची आई सुनीता ( वय 44) एका खासगी कंपनीत काम करत होत्या. तर त्याची बहीण अनुजा रेड्डी (वय 22) बी फार्मसीला शिकत होती, अशी माहिती मेधांचलचे पोलीस निरीक्षक एम. प्रवीण रेड्डी यांनी दिली.
प्रभाकर रेड्डी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मालमत्तेचे पैसे आणि त्यांच्या विम्याची रक्कम सुनीता यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती. त्या बँक खात्याची माहिती साईनाथकडे होती. तसेच इंटरनेट बँकिंगचा पासवर्डही त्याच्याकडे होता. त्याने सुनीता यांना कोणतीही माहिती न देता 20 लाख रुपये खात्यातून काढले होते. तसेच क्रिकेट सट्टेबाजीत ते पैसे तो गमावून बसला होता. त्यानंतर क्रिकेटच्या सट्टेबाजीमुळे झालेले कर्ज फेडण्यासाठी त्याने सुनीता यांचे 15 तोळ्यांचे दागिनेही विकले होते.
सुनीता आणि त्यांची मुलगी अनुजाला याबाबत समजल्यानंतर त्यांनी साईनाथला समज देत सट्टेबाजी सोडण्यास सांगितले. आई आणि बहिणीने समज दिल्याचा राग साईनाथच्या मनात होता. त्यामुळे त्यांचा बदोबस्त करून सर्व मालमत्ता विकून क्रिकेट सट्टेबाजीसाठी पैसे जमवण्याची योजना त्याने आखली. त्यांना मार्गातून दूर केल्यावर आपण मालमत्ता विकू आणि आपला मार्ग मोकळा होईल, असे त्याला वाटले.
आई आणि बहीणीला संपवण्यासाठी साईनाथने किटकनाशक घेतले आणि 23 नोव्हेंबरला ते त्यांच्या जेवणात मिसळले. त्यानंतर संशय येऊ नये म्हणून त्याने आपला डबाही तयार केला. जेवण झाल्यावर सुनीता आणि अनुजा यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे सुनीता यांनी साईनाथला फोन केला. मात्र, त्याचा मोबाईल बंद होता. त्याने तो मुद्दाम बंद ठेवला होता. त्यानंतर त्याने रात्री फोन सुरू करून आईचे कॉल आणि मेसेज पाहिले.
मेसेज पाहिल्यावर तो तातडीने घरी आला. आई आणि बहीण वेदनेने तळमळत असतानाही त्याने त्यांना रुग्णालयात नेले नाही. त्या दोघी बेशुद्ध होईपर्यंत त्याने वाट पाहिली. त्या बेशुद्ध झाल्यावर त्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान सुनीता यांचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला तर अनुजाचा 27 नोव्हेंबरला मृत्यू झाला.
घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तपासाला सुरुवात केली. नातेवाईकांनी साईनाथबाबत संशय व्यक्त केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडावाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. क्रिकेटच्या सट्ट्यासाठी मालमत्ता विकण्याचा हेतू असल्याने आपण आई आणि बहिणीची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याच्याविरोधात हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.


























































