न्यूझीलंडवरील थरारक विजयानंतरही इंग्लंडला धक्का; WTC मधील 2 गुणही गमावले अन् दंडही झाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीमध्ये थरारक विजय मिळवल्यानंतरही इंग्लंडच्या संघाला धक्का बसला आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेणाऱ्या इंग्लंडने दुसऱ्या लढतीत निर्धारित वेळेपेक्षा दोन षटके कमी टाकल्याने त्यांना आयसीसीने दंड ठोठावला आहे. मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी इंग्लंडच्या संघाचे दोन गुण कापले आहेत, तसेच सर्व खेळाडूंना मॅच फी मधील 40 टक्के रक्कम दंड म्हणून भरण्याचेही निर्देश दिले आहेत.

आयसीसीच्या नियमानुसार सामन्यात निर्धारित वेळेपेक्षा एक षटक कमी फेकल्यास एक गुण आणि मॅच फीच्या 20 टक्के रक्कम दंड होते. मात्र इंग्लंडने निर्धारित वेळेपेक्षा दोन षटके कमी टाकली. मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी त्यामुळे इंग्लंडच्या संघाला दंड ठोठावला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यानेही आपली चुकी मान्य केली आहे.

दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडचा संघ सध्या आठव्या स्थानावर आहे. स्लो ओव्हर रेटमुळे आतापर्यंत इंग्लंडचे 12 गुण कापले गेले आहेत. त्यामुळे इंग्लंडच्या टॉप-5मध्ये प्रवेश करण्याच्या आशांना सुरुंग लागला आहे.

इंग्लंडने आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 14 सामने खेळले आहेत. यात त्यांना फक्त 3 सामने जिंकता आले असून 7 सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला, तर 4 अनिर्णित राहिले. इंग्लंड सध्या 40 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. स्लो ओव्हर रेटमुळे त्यांचे 12 गुण कापले गेले नसते तर इंग्लंडचा संघ सातव्या स्थानावर असता. इंग्लंडप्रमाणे हिंदुस्थानचेही आतापर्यंत 3 आणि वेस्ट इंडिजचे 2 गुण स्लो ओव्हर रेटमुळे कापण्यात आलेले आहेत.

थरारक विजय

दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा 5 विकेट्सने पराभव केला. जॉनी बेअरस्टो इंग्लंडच्या या रोमहर्षक विजयाचा नायक राहिला. बेअरस्टोने इंग्लंडसाठी दुसरे सर्वात जलद कसोटी शतक झळकावले. न्यूझीलंडने इंग्लंडपुढे पाचव्या दिवशी दोन सत्रांचा खेळ बाकी असताना विजयासाठी 299 धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात यजमान इंग्लंडने ताबडतोड फलंदाजी करत अवघ्या 50 षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला. बेअरस्टनने 92 चेंडूत 136 धावा केल्या. चार बाद 93 अशा बिकट स्थितीत असताना बेअरस्टोने कर्णधार बेन स्टोक्सला (नाबाद 75) हातीशी धरत इंग्लंडला अशक्यप्राय विजय मिळवून दिला.