इंग्लंडने रशियाची 2 विमाने ताब्यात घेतली, तणाव वाढण्याची दाट शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू असून बुधवारी या युद्धाचा 14 वा दिवस आहे. युक्रेनवासी आपले राष्ट्र वाचवण्यासाठी प्राणाची पर्वा न करता लढत असताना युरोपात एक वेगळं नाट्य रंगायला सुरूवात झाली आहे. इंग्लंडने रशियाची दोन विमाने पकडली आहेत. यामुळे रशिया आणि इंग्लंडमधला तणाव आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यानंतर इंग्लंडने जाहीर केलं होतं की जर रशियाचं विमान त्यांच्या हद्दीत घुसलं तर तो गुन्हा मानला जाईल आणि ते विमान जप्त करण्यात येईल.

इंग्लंडने त्यांची हवाई सीमा रशियासाठी बंद केल्यानंतर काही धनाढ्य रशियन व्यक्तींनी इतर देशांची चार्टर्ड विमाने वापरून इंग्लंडमध्ये ये-जा सुरू केली होती. हे कळताच इंग्लंडने अशा विमानांवरही बंदी घातली आहे. हँपशायरमधल्या फार्नबरो विमानतळावर एका विमानाची तपासणी केली जात असताना कळालं की त्या विमानाची नोंदणी लक्झेमबर्गमध्ये करण्यात आली होती. मात्र या विमानाचा मालक हा रशियन होता. हे विमान रशियाच्या नागरिकांना घेऊन आलं होतं. यामुळे इंग्लंडने हे विमान जप्त केलं आहे.

इंग्लंडच्या राणीचा अंगरक्षक युक्रेनला गेल्याचा संशय, ब्रिटीश गुप्तचर यंत्रणा हादरली

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असतानाच ब्रिटनच्या महाराणीचा अंगरक्षक गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. गायब होण्यापूर्वी अंगरक्षकाने पोलंडचे तिकीट काढले होते आणि आपल्या कुटुंबियांसाठी एक चिठ्ठीही सोडली होती. यानंतर त्याने एक स्नॅपचॅवर एक पोस्ट शेअर केली असून हा 19 वर्षीय अंगरक्षक युक्रेनकडून रशियाविरोधात युद्ध लढण्यास गेल्याचे स्पष्ट होत आहे.

महाराणीच्या अंगरक्षकासोबत ब्रिटनच्या सैन्यातील तीन सदस्य देखील अचानक गायब झाले आहेत. यामुळे ब्रिटश गुप्तचर यंत्रणा हादरली असून हे सैनिक युक्रेनकडून युद्धात उतरल्यास रशियाविरुद्ध युद्धात ब्रिटनही उतरल्याचे मानले जाईल. याचे गंभीर परिणाम ब्रिटनला भोगावे लागतील. असे झाल्यास तिसरे महायुद्ध सुरू होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही.

चार सैनिक अचानक गायब झाल्याने ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालायचीही चिंता वाढली आहे. सुरक्षा दलाच्या प्रमुखांनी ब्रिटनच्या महाराणीच्या अंगरक्षकासह गायब झालेल्या सर्व सैनिकांना तात्काळ पकडण्याचे आदेश दिले आहे. कोणतेही कारण न देता ड्यूटीवरून अचानक गायब होणे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. पकडल्यानंतर त्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल, असे ब्रिटन सैन्याच्या माजी अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, ब्रिटनकडून रशियाविरोधात युद्धात उतरण्याची परवानगी फक्त माजी सैनिकांना दिली आहे. आतापर्यंत रशियाविरोधात 52 देशांच्या 20 हजार स्वयंसेवकांनी युक्रेकडून युद्धात सहभाग घेता आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये सक्रिय असणारे सैनिक जर युद्धात उतरले तर रशियाविरोधात ब्रिटनने दंड थोपटले असे मानले जाईल आणि याचे जागतिक स्तरावरही गंभीर परिणआम होतील.

रशियाची धमकी

युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू करण्यापूर्वी रशियाने संपूर्ण जगाला धमकीवजा इशारा दिला होता. व्लादिमीर पुतीन यांनी रशिया आणि युक्रेन युद्धात कोणता तिसरा देश आल्यास त्याला याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असे म्हटले होते.