इंग्लंडमध्ये लस घेतलेल्या लोकांचे कोरोनाने मृत्यू, वैद्यकीय तज्ज्ञ चिंतेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा विळखा सोडवण्यासाठी जगभरात लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत आहे. त्यामुळे लसीकरणावर भर दिला जात आहे. पण, इंग्लंडमध्ये मात्र लसीकरणासंबंधीच्या एका अहवालाने वैद्यकीय तज्ज्ञ चिंतेत पडले आहेत. कारण, या अहवालानुसार ज्या नागरिकांनी लस घेतली होती, त्यांची कोरोनाने मृत्यू होण्याची संख्या लस न घेतलेल्यांपेक्षा जास्त आहे.

पब्लिक हेल्थ इंग्लंज अर्थात पीएचईने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, इंग्लंडमध्ये 1 फेब्रुवारी ते 21 जून या दरम्यान कोरोनाच्या डेल्टा वेरिएंटने संक्रमित झालेल्यांपैकी 257 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 163 जणांना कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस दिले गेले होते.

या अहवालावर तज्ज्ञांनीही आपली मतं दिली आहेत. त्यानुसार, लस घेतल्यानंतरही कोरोनाने संक्रमित होण्याचा आणि त्यातही मृत्यू होण्याचा धोका असतोच. याचा अर्थ हा नव्हे की, लस प्रभावी नाही किंवा मृत्युचा धोका कमी करत नाही. वयानुसार या धोक्याची टक्केवारी अर्थातच वाढते.

लस घेतल्यानंतरही वयस्कर नागरिकांना कोरोनाचा धोका असतोच. पण, पीएचईच्या डेटानुसार, लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर डेल्टा वेरिेएंटने संक्रमित झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याचा धोका 96 टक्क्यांनी कमी होतो.

अर्थात, लस घेऊनही हा धोका राहत असला तरीही त्याची टक्केवारी घटलेली दिसून आली आहे. त्यामुळे लसीकरणाला पर्याय नसल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.