प्रसिद्ध गायक केके यांचे निधन, लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आला हृदयविकाराचा झटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. प्रसिद्ध बॉलीवूड पार्श्वगायक के.के. उर्फ कृष्णकुमार कुन्नथ मंगळवारी एका स्टेज शो दरम्यान खाली कोसळले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. ते 53 वर्षांचे होते.

के.के. मंगळवारी कोलकाता येथील विवेकानंद कॉलेजमध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. या कॉन्सर्ट


नंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे ते कोसळले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

गायक केके हे मुळचे दिल्लीचे रहिवासी होते. कृष्णकुमार कुन्नथ हे गायक केके म्हणून जास्त प्रसिद्ध होते. तेथील किरोरी माल महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच प्रसिद्ध गायक किशोर कुमार आणि संगीतकार आरडी बर्मन यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. केके गायक होण्यापूर्वी त्यांनी सुमारे 8 महिने सेल्समन म्हणून काम केले होते. मात्र त्यात त्यांचे फारसे मन रमले नाही आणि त्यांनी पुढे त्यांच्या गाण्याची आवड जोपासली आणि त्यात करिअर करण्याचा निर्णय घेतला. 1994 मध्ये ते मुंबईत पोहोचले आणि त्यानंतर गायिका शिबानी कश्यपसोबत जिंगल्स गाण्यास सुरुवात केली. त्यांनी केवळ हिंदीच नाही तर गुजराती, तेलुगू, तामिळ, कन्नड, मराठी, बंगाली आणि मल्याळम गाण्यांनाही आपला आवाज दिला.

 

त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.

हे गाणे 3 हजार जिंगल्समध्ये गायले गेले

केके यांच्या गाण्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी 3 हजारहून अधिक जिंगल्स गायले होते. 1999 मध्ये त्यांनी संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील ‘तडप-तडप’ हे गाणे गायले होते आणि ते गाणे त्यांच्यासाठी टर्निंग पॉईण्ट बनले. गाणे खूप प्रसिद्ध झाले आणि त्यांची चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण झाली. त्याच वर्षी त्यांचा एक अल्बमही रिलीज झाला. या अल्बममधील ‘याद आएगा वो पल’ हे गाणे तरुणांमध्ये लोकप्रिय झाले.  त्यानंतर ‘हमराज’मधील बरदाश्त नही कर सकता, ‘दस’मधील दस बहाने, ‘ओम शांती ओम’मधील आखो में तेरी, ‘बचना ए हसिनो’मधील खुदा जाने या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळाला.