एस्केलेटर्सच्या देखभालीची बोंब, वारंवारच्या बिघाडामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वे मार्गावरील स्थानकांमध्ये एस्केलेटरच्या (सरकते जिने) देखभाल दुरुस्तीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एस्केलेटरची योग्य प्रकारे देखभाल केली जात नसल्यामुळे प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मीरा रोड रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरील एस्केलेटर सुरू होण्याची प्रतीक्षा प्रवासी अनेक महिन्यांपासून करत होते. मात्र, संबंधित एस्केलेटर सुरू केल्यानंतर सुविधेपेक्षा प्रवाशांना गैरसोयच जास्त ठरत आहे. दोन महिन्यांपूर्वी बसवण्यात आलेले नवीन एस्केलेटर वारंवार नादुरुस्त होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून ते पूर्णपणे बंद असल्याने गर्भवती महिला, वृद्ध तसेच जड सामान असलेल्या प्रवाशांना पायऱ्या चढून जावे लागत आहे. अंधेरी स्थानकातील एस्केलेटरचीही हीच स्थिती आहे. अंधेरी स्थानकातील एस्केलेटर तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासनाचे देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून दिली जात आहे.

चर्चगेट ते विरारदरम्यान 106 एस्केलेटर बसवण्यात आले आहेत, मात्र मागील दोन-तीन वर्षांत तब्बल 1 लाख 93 हजारवेळा एस्केलेटर्समध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.

प्रत्येक एस्केलेटर दिवसातून किमान 5 वेळा बंद पडत आहे. रेल्वे प्रशासनाने कोटय़वधी रुपये खर्च करूनही प्रवाशांना साध्या सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.