विक्रमी विजयासह इठली उपांत्यपूर्व फेरीत; एक्स्ट्रा टाईममध्ये किएसा, पेसिनाने केले विजयी गोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रॉबर्टो मॅनचिनी यांच्या मार्गदर्शनाखाली इटलीचा फुटबॉल संघ विजयीपथावर रूढ झालाय. ‘अझुरी’ या नावाने ओळखल्या जाणाऱया इटली संघाने शनिवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत ऑस्ट्रियाची झुंज 2-1 अशा फरकाने एक्स्ट्रा टाईममध्ये मोडून काढली आणि युरो फुटबॉल चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. फेडरिको किएसा व मॅटीओ पेसिना या दोन बदली फुटबॉलपटूंनी अनुक्रमे 95 व 105 मिनिटाला गोल करीत इटलीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. इटलीने याप्रसंगी सलग 12व्या विजयाला गवसणी घातली. तसेच मागील 31 लढतींमध्ये या संघाने पराभवाचा चेहरा पाहिलेला नाहीए. हाही इटलीचा राष्ट्रीय विक्रमच ठरलाय.

पूर्वार्ध इटलीचा, तर उत्तरार्ध ऑस्ट्रियाचा

इटली-ऑस्ट्रिया यांच्यामधील लढतीत इटली सहज जिंकेल असा सूर फुटबॉलतज्ञांकडून व्यक्त करण्यात आला. या लढतीच्या पूर्वार्धात इटलीच्या फुटबॉलपटूंनी जबरदस्त खेळ करीत तज्ञांचा विश्वास सार्थ ठरवला. मात्र त्यांना शेवटचा पंच देण्यात अपयश येत होते. इटलीकडे या सत्रात तीन ते चार गोल करण्याच्या संधी होत्या. पण त्यांना गोल काही करता आला नाही. उत्तरार्धात इटली गोल करील आणि ऑस्ट्रिया लढत न देताच पराभूत होईल असे वाटत होते. पण प्रत्यक्षात झाले उलटे. ऑस्ट्रियन खेळाडूंनी उत्तरार्ध गाजवला. त्यामुळे निर्धारीत वेळेत दोन देशांमध्ये गोलशून्य बरोबरी झाली.

इटली-ऑस्ट्रिया लढतीची आकडेवारी

  • इटला ऑस्ट्रिया
  • गोल 2 1
  • शॉट 27 16
  • शॉट ऑन टार्गेट 6 3
  • बॉलवरील ताबा 52 48
  • ऑफसाईड 4 2
  • कॉर्नर्स 4 3
  • यलो कार्ड 2 3
  • रेड कार्ड 0 0

अचूक चाल व भन्नाट गोल

पूर्वार्धात गोलपासून दूर राहिलेल्या इटलीच्या संघात उत्तरार्धापासून काही बदल करण्यात आले. मुख्य प्रशिक्षक रॉबर्टो मॅनचिनी यांनी निकोला बरेला, मार्को वेराटी, सिरो इममोबिले, लोरेन्झो इनसिने, डोमेनिको बेरार्डी या प्रमुख खेळाडूंना टप्प्याटप्प्याने बदलले. या खेळाडूंऐवजी मॅन्युएल लोकाटेली, आंद्रिया बेलोटी, मॅटिओ पेसिना, फेडरिको किएसा व ब्रायन क्रिस्टॅण्ट या खेळाडूंना संघात घेतले. यापैकी दोघांनी एक्स्ट्रा टाईममध्ये गोल करीत रॉबर्टो मॅनचिनी यांचा निर्णय ‘मास्टरस्ट्रोक’ होता हे दाखवून दिले. फेडरिको किएसाने तीन टचसह केलेला गोल भन्नाट होता. त्यानंतर वेल्सविरुद्ध विजयी गोल करणाऱया मॅटिओ पेसिनाने इटलीसाठी दुसरा गोल करीत ऑस्ट्रियाचा खेळ खल्लास केला.

82 वर्षांनंतर नवा विक्रम

विटोरिया पोझ्झो यांच्या मार्गदर्शनाखाली इटलीने 1935 ते 1939 या कालावधीत सलग 30 लढतींमध्ये पराभव पाहिलेला नव्हता. या कालावधीत इटलीचा संघ दोन वर्ल्ड कप व एक ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकला. त्यानंतर आता तब्बल 82 वर्षांनंतर रॉबर्टो मॅनचिनी यांच्या मार्गदर्शनाखाली इटलीने 31 लढतींमध्ये विजयी मालिका सुरू ठेवत नव्या विक्रमावर मोहोर उमटवली. तसेच इटलीविरुद्ध मागील 11 लढतींमध्ये प्रतिस्पर्ध्यांकडून एकही गोल करण्यात आलेला नव्हता. ऑस्ट्रियाच्या सासा पॅलॅजीक याने 114व्या मिनिटाला गोल केला आणि ही मालिका खंडित झाली. तब्बल 1168 मिनिटांनंतर इटलीविरोधात एक गोल झाला.

इटलीची ऐतिहासिक कामगिरी

सामने – 31

विजय – 26

प्रतिस्पर्धी संघ गोलरहीत लढती – 23

गोल करण्याची संख्या – 83

प्रतिस्पर्धी संघाकडून झालेल्या गोलांची संख्या – 8